मोताळ्यात कोपर्डी प्रकरणाचा निषेध
By Admin | Updated: July 20, 2016 00:18 IST2016-07-20T00:18:56+5:302016-07-20T00:18:56+5:30
मोताळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

मोताळ्यात कोपर्डी प्रकरणाचा निषेध
मोताळा (जि. बुलडाणा) : कर्जत तालुक्यातील कोपर्डी (जि.अहमदनगर) येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निंदनीय हत्याकांडप्रकरणी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्यावतीने मंगळवारी मोताळा येथे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व महिला पदाधिकार्यांसह तालुकाभरातील नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आरोपींविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली व तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सामूहिक निवेदन दिले.
मोताळा बसस्थानकावरून सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत तहसील कर्यालयावर मोर्चा नेला. या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पाटील यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून अत्याचार करणार्या त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. पत्रकार विश्वास पाटील यांनी समाजामध्ये पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करीत संबंधित खटला ह्यफास्ट ट्रॅकह्ण न्यायालयात चालवून पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. शिवसेना नेते गजानन मामलकर यांनी अत्याचार प्रकरणात सहभागी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी व दोषींविरुद्ध कडक कारवाई करून या कुटुंबाला न्याय देण्याकरिता आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.