प्रगतिशील शेतकऱ्याने साधली दुग्ध व्यवसायातून प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:56+5:302021-08-20T04:39:56+5:30
सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी समाधान पाटील बुधवंत यांनी धाड येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती ...

प्रगतिशील शेतकऱ्याने साधली दुग्ध व्यवसायातून प्रगती
सोयगाव येथील प्रगतिशील शेतकरी समाधान पाटील बुधवंत यांनी धाड येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे समाधान बुधवंत हे पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. तरी त्यांनी आपल्या शांत-संयमी वृत्तीमुळे व्यवसायात ठसा उमटवला. दुग्ध व्यवसायासाठी लागणारे पुरेसे भांडवल नव्हते, वडिलोपार्जित शेती व्यवसाय होता. त्यात फारसा नफा राहत नसल्यामुळे त्यात निसर्गाची कधी अतिवृष्टी, अवकृपामुळे शेती पूर्ण तोट्यात होती. शेतीला जोडधंदा द्यावा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला.
त्यांनी प्रथमच एक संकरित गाय घेतली. तिच्यापासून झालेल्या कालवडींचा सांभाळ केला व गायींची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. समाधान बुधवंत व त्यांच्या गोठ्यात आता जवळपास ५० ते ५१ संकरित गायी असून, त्यामध्ये २५ ते ३० गायी दूध देतात. वीस गायी गाभण आहेत. नियमित ओला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी वीस एकर शेतीपैकी सात एकर शेतीत कडवळ, मका, घास गवत तसेच अन्य चारापिके आलटून पालटून घेतली जातात. जनावरांसाठी कडबाकुट्टीचा वापर केला जातो. संतुलित आहार दिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहत आहे. शिवाय गायींची शारीरिक क्षमता चांगली राहते. याच पद्धतीने १६ ते १८ महिने वयाच्या जवळपास २५ संकरित कालवडींचे संगोपन त्यांनी केले आहे.
जनावरांच्या आरोग्याची घेतली जाते काळजी
गोठ्यातील लहान-मोठे मिळून जवळपास ५० ते ५१ जनावरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घेतली जाते. गायींना वर्षातून दोन वेळा लाळ्या, खुरकुत प्रतिबंधक लसीकरण फायलेरिया रिसर्चच्या वेळी लसीकरण घेतात. सध्या दूध देणाऱ्या २० ते २२ गायी आहेत. दररोज दोन वेळचे मिळून दोनशे लिटर दूध मिळते. दुधाला प्रति लिटर २५ ते ३० रुपये दर मिळतो. दुधाची अमर डेअरी धाड मुख्यालय बोदवड या डेअरीला विक्री होते. यापासून दररोज किमान सहा हजार रुपये उत्पन्न मिळते.
शेणखतातूनही मिळते उत्पन्न
लहान-मोठे मिळून ५१ जनावरांपासून दरवर्षी सुमारे ५० ते ६० ट्रॉली शेणखत मिळत असून, सध्या तीन ते चार हजार रुपये खताचा दर आहे. त्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी किमान १५ ते २० नवीन कालवडी विक्री होतात. किमान १८ महिने वयाच्या प्रति कालवडीपासून वीस ते पंचवीस हजार रुपये मिळतात. शेणखतापासून मिळालेले पैसे जनावरांच्या खाद्यासाठी वापर केला जातो. त्यामुळे दूध व कालवडीपासून उत्पन्न फायद्यात राहते, असे समाधान बुधवंत यांनी सांगितले.