प्राधान्यक्रम नाेंदवले, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा; १९६ व्यवस्थापनाची मुलाखतीसह शिक्षक भरती संथगतीने
By संदीप वानखेडे | Updated: June 25, 2023 17:00 IST2023-06-25T16:59:11+5:302023-06-25T17:00:02+5:30
शिक्षकांची पदभरती पारदर्शीपणे व्हावी, या हेतूने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्राधान्यक्रम नाेंदवले, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा; १९६ व्यवस्थापनाची मुलाखतीसह शिक्षक भरती संथगतीने
बुलढाणा : पवित्र पाेर्टलवर माेठा गाजावाजा करून सुरू केलेली २०१७ ची शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही़ १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी उमेदवारांनी ५ जूनपर्यंत प्राधान्यक्रम लाॅक केले आहेत़ २० दिवस लाेटल्यानंतरही गुणवत्ता यादीच जाहीर झाली नसल्याचे चित्र आहे.
शिक्षकांची पदभरती पारदर्शीपणे व्हावी, या हेतूने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी २०१७ मध्ये शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली हाेती. ही शिक्षक भरती सहा वर्षे लाेटली तरी अजूनही पूर्ण झालेली नाही. मुलाखतीविना शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच त्यापैकी काही रिक्त राहिलेल्या जागा रिक्तच आहेत. त्यातच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले हाेते.
मे महिन्यात गुणवत्ता यादी लागेल अशी अपेक्षा असताना पुन्हा २९ मे राेजी काही उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात तांत्रिक अडचणी आल्याचे समाेर आले. त्यामुळे ६ हजार ९१९ उमेदवारांकडून ३० मे ते ५ जून राेजी पुन्हा प्राधान्यक्रम नाेंदवण्यात आले. प्राधान्यक्रम नाेंदवण्याची मुदत ५ जून राेजी संपली आहे. मात्र, अद्यापही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
नवीन शिक्षक भरती संथगतीने
माेठ्या अवधीनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२३ मध्ये घेतली आहे. या चाचणीचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीमुळे शिक्षक भरतीची गती संथ झाली आहे. संच मान्यता झाल्यानंतरच आता या शिक्षक भरतीचा मुहूर्त निघणार आहे.