जिल्हा बाल संरक्षण कक्षाने राेखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:57+5:302020-12-29T04:32:57+5:30
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह ७ जानेवारी राेजी हाेणार असल्याची माहिती १७ डिसेंबर रोजी चाइल्ड ...

जिल्हा बाल संरक्षण कक्षाने राेखला
मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह ७ जानेवारी राेजी हाेणार असल्याची माहिती १७ डिसेंबर रोजी चाइल्ड लाइन यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. त्यानंतर लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाइल्ड लाइनचे समन्वयक, समुपदेशक यांनी मुलीच्या वयाचे पुरावे मिळवून मुलीचा होणारा विवाह हा बालविवाह आहे की नाही याची शहानिशा केली. खात्री पटल्यानंतर संबंधित यंत्रणेशी संपर्क केला आणि मुलीला तिच्या आई-वडिलासह बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्यासमोर हजर करण्यात आले.
मुलीसह कुटुंबाला माहिती देऊन हा बालविवाह रद्द केल्याबाबतचा जबाब लिहून घेण्यात आला. तसेच असा विवाह पार पाडल्यास काय कार्यवाही होऊ शकते याची माहिती मुलीच्या कुटुंबाला देण्यात आली. अशाप्रकारे बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या समक्ष बाल विवाह रद्द करण्यात आला. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तथा जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक मोहीम राबवित आहे. जिल्ह्यात कुठेही, शहरात, गावात जर बालविवाह होत असेल, तर तत्काळ चाइल्ड लाइन यांना किंवा टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क करावा. तसेच संबंधित यंत्रणेस व कार्यालस संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.