वीज रोहित्र बनले धोकादायक!
By Admin | Updated: June 19, 2017 04:28 IST2017-06-19T04:28:02+5:302017-06-19T04:28:02+5:30
उघड्या रोहित्रांकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष; शॉर्ट सर्किटची समस्या.

वीज रोहित्र बनले धोकादायक!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहर व ग्रामीण भागात वीज खांबावर लावण्यात आलेले विजेचे रोहित्र उघडे असतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोकाट जनावरांसह नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वीज कंपनीच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून शहरातील जवळपास सर्व वीज खांब व त्यावरील वीज रोहित्रांची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, अवघ्या एकच महिन्यात पुन्हा वीज रोहित्रांची परिस्थिती जैसे थे झाली. आज शहरातील वर्दळीच्या ठिकाणावरील विजेचे रोहित्राच्या पट्या उघड्या आहेत. रोहित्र जमिनीपासून अगदी काही फुटावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यातील जिवंत वीज तारा जमिनीपर्यंंंत लोंबकळताना दिसतात.
याठिकाणी काही लघू व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसतात. त्यांच्या जीवित्वास या रोहित्रामुळे धोका निर्माण झाला आहे. अनेकवेळा या रोहित्रामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीचा मोठा भडका होतो. ग्रामीण भागात उघड्या वीज रोहित्रातून विजेचा धक्का बसून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहे. या शहरातील मुख्य रस्त्यावरील रोहित्रांना लोखंडाची पेटी आहे. या पेट्याचे लॉक तुटले असल्यामुळे शिवाय लाइमनच्या दुर्लक्षामुळे रोहित्र झाकणे नेहमीच उघडे राहतात. अशीच स्थिती ग्रामीण भागातही आहे.
ग्रामीण भागातही बहुतांश खेडेगावात रोहित्र उघडेच राहते. संबंधित अधिकार्यांसह लाइमनचे सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक व जनावरांचे जीवन धोक्यात आले आहेत.