नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस गोटातून एकमेव अर्ज दाखल
By Admin | Updated: April 2, 2017 16:47 IST2017-04-02T16:47:59+5:302017-04-02T16:47:59+5:30
मोताळा: मोताळा नगरपंचायतीच्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी काँग्रेस गटाच्या सुवर्णा अनंतराव देशमुख यांचा एकमेव अर्ज शनिवारी दाखल झाला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस गोटातून एकमेव अर्ज दाखल
मोताळा: मोताळा नगरपंचायतीच्या ७ एप्रिल रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १ एप्रिल रोजी काँग्रेस गटाच्या सुवर्णा अनंतराव देशमुख यांचा एकमेव अर्ज शनिवारी दाखल झाला आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
मोताळा नगरपंचायतीच्या काँग्रेस गटाच्या नगराध्यक्षा माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांनी २३ मार्च रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सात एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मोताळा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दोन वाजेनंतर त्याच दिवशी नामनिर्देशन अर्जाची छाननी होणार असून, संध्याकाळी ५ वाजता वैद्य उमेदवारांची यादी घोषित होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना ६ एप्रिल रोजी आपले अर्ज मागे घेता येणार आहे.
मोताळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी बाजी मारून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदे अविरोध प्राप्त केली होती. त्यावेळी आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात प्रथम नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या माधुरी पुरूषोत्तम देशमुख यांना प्रथम नगराध्यक्षपदाचा मान मिळाला होता. मोताळा नगरपंचायतीत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्ष नेतृत्वाने सव्वा-सव्वा वषार्चा फॉम्युर्ला ठरवून दिला होता. त्यानुसार ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा माधुरी देशमुख यांनी २३ मार्च रोजी अप्पर जिल्हाधिकारीकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस गटाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे ७ एप्रिल रोजी आवश्यकता भासल्यास नगराध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शनिवारी काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा अनंतराव देशमुख यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी आ. हर्षवर्धन सपकाळ यांचे स्वीय सहायक राजु केने, तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अनिल खाकरे, युवा नेते गणेशसिंग राजपूत, बुलडाणा शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष शरद राखोंडे, नगरसेविका हसमतबी जलील, जायदाबी शे. मुसा, सोनाली देशमुख, अंजली सुरेश खर्चे, छाया दिलीप वाघ, शे. सलीम ठेकेदार, ईस्माईल जमादार, वासुदेव इंगळे, रफीक ठेकेदार आदी उपस्थित होते. सोमवारी दोन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. अर्ज छाननी त्याच दिवशी दोन वाजेनंतर करण्यात येवून अर्ज फेटाळलेल्यांची नावे व कारण तसेच संध्याकाळी ५ वाजेनंतर वैद्य उमेदवारांच्या अर्जांची यादी याच दिवशी जाहीर करण्यात येईल. गुरूवारी ६ तारखेला चार वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. निवडणूक शुक्रवारी ७ तारखेला होईल.