बुलढाण्याच्या एसपींच्या बदलीची शक्यता, नवीन नाव गुलदस्त्यात
By भगवान वानखेडे | Updated: September 13, 2022 13:17 IST2022-09-13T13:11:16+5:302022-09-13T13:17:16+5:30
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

बुलढाण्याच्या एसपींच्या बदलीची शक्यता, नवीन नाव गुलदस्त्यात
बुलढाणा : राज्यातील सत्ता पालटानंतर आता शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा महापूर सुरु होणार आहे. यामध्ये महसूल आणि गृह विभागात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. त्यात बुलढाण्याच्या एसपींच्या बदलींचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस विभागातील हे फेरबदल याच आठवड्यात होणार असले तरी अद्याप नवीन पोलीस अधीक्षकांचे नाव गुलदस्त्यात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच गृह आणि महसूल विभागातील आवडीचे,सोबतच कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून, हे फेरबदल याच आठवड्यात वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांपासून सुरु होणार आहेत. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांचाही जिल्ह्यातील दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने त्यांचीही याच आठवड्यात बदली होणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे.
टप्प्या-टप्प्याने होणार बदल्या
२० सप्टेंबरपर्यंत गृह विभागात मोठे फेरबदल होऊ घातले आहेत. अशातच जिल्ह्यातील एसपींच्या बदलींनंतर टप्प्या-टप्प्याने इतर अधिकाऱ्यांच्या आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. हे बदल अनेकांच्या हिताचे तर अनेकांच्या पथ्थ्यावर पडणार आहेत.
अपर पोलीस अधीक्षकांसह तीन डीवायएसपी मिळणार?
बुलढाणा पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षकांसह देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी,होम डीवायएसपीसह आर्थिक गुन्हे शाखेच्या डीवायएसपींचेही पद रिक्त आहे. तेव्हा या फेरबदलात बुलढाणा जिल्ह्याला कायमस्वरुपी अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिळतात का? हे येणारा काळच सांगणार आहे.
बदल्यांचा निर्णय हा वरिष्ठ स्तरावरुन होणार आहे. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांचे पालन करावेच लागते. आदेश केंव्हा निघणार याबाबत काही सांगता येत नाही.
-अरविंद चावरीया,जिल्हा पोलीस अधीक्षक,बुलढाणा.