Positive Results of Social Unity Councils! | सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!
सामाजिक ऐक्य परिषदांचे सकारात्मक परिणाम!

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: समाजात एकोपा आणि शांतता प्रस्थापित करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या सामाजिक ऐक्य परिषदांचे बुलडाणा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम येत असल्याचे चित्र  आहे. विविध धार्मिक सण, उत्सव आणि इतर सामाजिक सणांच्यावेळी आयोजित सामाजिक ऐक्य परिषदांमुळे समाजातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मदत होत असल्याचे दिसून येते. संवेदनशील शहर आणि ग्रामीण भागातही या परिषदांमुळे सामाजिक सलोखा राखल्या जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. 
पोलिस प्रशासनाकडून समाजात वेळप्रसंगी कायद्याचा बडगा उगारल्या जातो.  समाजातील अपप्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक असतो. मात्र, काहीप्रसंगी पोलिसांमधील मानविय दृष्टीकोन काम करून जातो.  प्रेम आणि आत्मिय भावनेमुळे अट्टल गुन्हेगार सुधारल्याची अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. व्यक्ती सोबतच समाजाच्या बाबतीतही हीच बाबू लागू पडते. त्यामुळे गत काही दिवसांमध्ये बुलडाणा जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बुलडाणा जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘सामाजिक ऐक्य परिषद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. धार्मिक सण, उत्सव आणि महत्वाच्या प्रसंगी सामाजिक ऐक्य परिषद आणि शांतता समिती सभांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक सौहार्द राखण्यासाठी मदत मिळाली.

 
येथे झाली ‘सामाजिक ऐक्य परिषद’!

बुलडाणा जिल्ह्यात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव, विविध धार्मिक सुणासुदीच्या काळात तसेच महत्वाच्याप्रसंगी सामजिक ऐक्य परिषद आयोजित करण्यात येतात. सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंचे एकाचवेळी प्रबोधन ठेवण्यात येते. मानवतेचा दृष्टीकोन हे धर्मगुरू समाजासमोर मांडतात. सामाजिक एकतेचे महत्व पटविणाºया सामाजिक ऐक्य परिषदा घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, वडनेर भोलजी, जळगाव जामोद, जामोद, पिंपळगाव राजा, मलकापूर, माटरगाव तर घाटावरील बुलडाणा, चिखली, मेहकर, साखरखेर्डा, देऊळगाव राजा, दुसरबीड, बोराखेडी, धाड, मेहकर येथे घेण्यात आल्या.

 
शांतता समिती सभांनाही सकारात्मक यश!
‘सामाजिक ऐक्य परिषद’ या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसोबतच बुलडाणा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखाली आणि घाटावरील विविध विभागात शांतता समितीच्या बैठका सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येतात. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १८ शांतता समितीच्या सभा आयोजित करण्यात आल्या. या बैठकांना विविध ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. 


 
बुलडाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक गोष्ट कायद्याने सुधारू शकत नाही. अनेक ठिकाणी मानवीय दृष्टीकोन कामी येतो. समाजात सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.
- डॉ. दिलीप पाटील भुजबळ
जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

Web Title: Positive Results of Social Unity Councils!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.