लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद; पण तरीही 'या' कंपनीनं गाठला पॉपकॉर्न विक्रीचा नवा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 03:54 IST2020-10-07T03:52:34+5:302020-10-07T03:54:13+5:30
चित्रपटगृहे बंद असल्याने घरात बसूनच लोकांनी टीव्हीचे कार्यक्रम, चित्रपट बघत पॉपकॉर्न फस्त करीत आवडते कार्यक्रम पाहण्याचा आनंद लुटत आहेत.

लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद; पण तरीही 'या' कंपनीनं गाठला पॉपकॉर्न विक्रीचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : लॉकडाऊनदरम्यान पॉपकॉर्न अँड कंपनीने मात्र अवघ्या सहा महिन्यात उच्चांक गाठत २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण विक्रीपेक्षाही अधिक विक्री केली. अल्पोपाहार म्हणून पॉपकॉर्नला भारतासह जगभरात आवडीने खाल्ले जातात. चित्रपटगृहे बंद असल्याने घरात बसूनच लोकांनी टीव्हीचे कार्यक्रम, चित्रपट बघत पॉपकॉर्न फस्त करीत आवडते कार्यक्रम पाहण्याचा आनंद लुटत आहेत.
लॉकडाऊनदरम्यान या कंपनीने पॉपकॉर्नचे १.६ लाख टीन्स विकले. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात या कंपनीने २.८६ कोटी रुपयांची विक्री केली. भारतीय स्वादासह ही कंपनीचे विविध स्वादातील पॉपकॉर्नला जगभरात पसंती आहे. पोषक अन्नपदार्थाला सर्वत्र पसंती मिळत असल्याने भारतातील पॉपकॉर्नच्या बाजारात जोमदार वाढ झाली आहे. २०१७ अखेर भारतातील पॉनकॉर्नची बाजारातील उलढाल २,०४० कोटी रुपयांच्या घरात होती, असे पॉपकॉर्न अँड कंपनीचे संस्थापक विकास सुरी यांनी सांगितले. कोरोनावरील लस कधी येईल, हे निश्चित नाही. त्यामुळे आर्थिक वर्षातील उर्वरित काळात पॉनकॉर्नच्या विक्रीत ३० ते ४० टक्के वाढ होईल, अशी त्यांना आशा आहे.