सात लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन
By Admin | Updated: April 14, 2017 00:01 IST2017-04-14T00:01:49+5:302017-04-14T00:01:49+5:30
बुलडाणा- खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.

सात लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
बुलडाणा : यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे व खतांचे राज्य स्तरावरच प्रभावी नियोजन असल्यामुळे शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरुवारी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, विभागीय सहसंचालक शु.रा. सरदार, पीडीकेव्हीचे विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले आदी उपस्थित होते. सभास्थळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, संजय रायमूलकर, महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले आदी उपस्थित होते.
कृषी योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचण्यासाठी दोन गाव मिळून कृषी मित्रांची निवड करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, की कृषी मित्रांची निवड लवकर करावी. त्यांनी नेमून दिलेल्या गावात कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. त्याचप्रमाणे आत्मा अंतर्गत शेतकरी समित्यांची स्थापना त्वरित करण्यात यावी. बोगस बियाणे, खत व कीटकनाशकांसंदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याचा त्वरित निपटारा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी. तक्रार करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना निर्माण केलेल्या व्यवस्थांची माहिती द्यावी. ते पुढे म्हणाले, शासनाने प्रधानमंत्री कृषी पीक विमा अंमलात आणली आहे. या योजनेत सर्वच पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे नुकसान झाले असल्यास त्याचाही लाभ या योजनेतून देण्यात येणार आहे. तसेच पीक कर्ज न घेतलेल्या, किडी पडलेल्या व पेरल्यानंतर पाऊस न आल्यामुळे करपलेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी होऊन येणाऱ्या खरीप हंगामात पीक नुकसानापासून आर्थिक संरक्षण प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महावितरणने त्यांच्याकडील मान्सूनपूर्व वीज यंत्रणेची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, रखडलेल्या वीज जोडण्या गतीने पूर्ण करून जळालेले रोहित्र बदलून देण्यात यावे. मृदा आरोग्य पत्रिका काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी जिल्ह्यात २०१७ - १८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती देऊन बैठकीचे प्रास्ताविक केले. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे. बैठकीच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सी.पी जायभाये यांनी पुढील वर्षात होणाऱ्या मान्सून पावसाचा अंदाज मांडला. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्न मांडले. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.