चिखली (जि. बुलडाणा), दि. २८- शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ-मोठे जीवघेणे खड्डे पडलेले असताना याबाबत वारंवार ओरड होऊनही पालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याने, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अनोखी शक्कल लढवित रस्त्यांवरील जीवघेण्या खड्डय़ांचे चित्र प्रदर्शन थेट रस्त्यावर लावल्याने पालिकेला आतातरी जाग येईल का? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.चिखली शहरातील प्रमुख मार्गांवर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांची खस्ता हालत असतानाही पालिकेकडून केवळ मुरूम अ थवा चुरी टाकून थातूर-मातूर डागडुजी केल्या जात असल्याने रस्त्यांची समस्या अधिकच बिकट झाली आहे. दरम्यान गणेशोत्सव, पोळा, बकरी ईद आदी सणवारांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने रस्ते तातडीने दुरूस्त करावे, अशी मागणी होत असतानाही त्याकडे पालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले. त्यातच आता नवरात्रोत्सव, दसरा आणि त्या पाठोपाठ दिवाळी सण तोंडावर असतानाही रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्यास पालिकेला वेळ नाही. याकडे लक्ष वेधण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर बोंद्रे, हर्षवर्धन चौधरी, गौरव खंडेलवाल, दत्ता खत्री, शे.अनिस, वसीम खान, आकाश पिंपरकर, करण खत्री, सोनु खंडागळे, भूषण भानुसे, नदीम पठाण, आदित्य झाल्टे, राम आटोळे, नीळकंठ महाले, आकाश मोरे, प्रवीण घड्याळे, उमेश पाटील, निखिल अंभोरे आदी कार्यकर्त्यांंनी हे अनोखे आंदोलन केले. शहर व खामगाव जालना महामार्गाची दुरवस्था त्यामध्ये झालेले खड्डे या नेहमीच्या विषयाला अनुसरून चिखली शहरामध्ये जीवघेण्या खड्डय़ांचे चित्न प्रदर्शनच ठिकठिकाणी लावण्यात आले आहे.
रस्त्यांवरील खड्डय़ांचे चित्र प्रदर्शन
By admin | Updated: September 29, 2016 01:43 IST