बुलढाणा : प्रवाशी वाहनाची कारला धडक, बालक ठार, चार जण गंभीर जखमी
By संदीप वानखेडे | Updated: March 26, 2023 17:39 IST2023-03-26T17:38:53+5:302023-03-26T17:39:20+5:30
प्रवाशी घेवून जात असलेल्या वाहनाने कारला जबर धडक दिली.

बुलढाणा : प्रवाशी वाहनाची कारला धडक, बालक ठार, चार जण गंभीर जखमी
मेहकर/सुलतानपूर : प्रवाशी घेवून जात असलेल्या वाहनाने कारला जबर धडक दिली. यामध्ये दहा वर्षीय बालक जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सुलतानपूर ते मेहकर मार्गावर २६ मार्च राेजी सकाळी घडली. आर्यन गजानन निखाडे (वय १०, रा. रामनगर लाेणार) असे मृत बालकाचे नाव आहे.
लाेणार येथील गजानन पुंडलिक निखाडे हे पत्नी सविता गजानन निखाडे व मुले अंश गजानन निखाडे, आर्यन गजानन निखाडे यांच्याबराेबर भाड्याने केलेली कार क्र.एम.एच., ४६ डब्ल्यू ३८३३ ने शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी २६ मार्च राेजी सकाळी जात हाेते.
दरम्यान, मेहकरजवळ समाेरून येणाऱ्या प्रवाशी वाहन क्र. एम.एच. ४६ एन ४५३४ ने कारला जबर धडक दिली. घटनेची माहिती मिळताच हेड काॅन्स्टेबल लक्ष्मण कटक, पाेकाॅ अमाेल परिहार आणि सुनील देशमुख यांनी तातडीने जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
तेथे डाॅक्टरांनी आर्यन गजानन निखाडे यास मृत घाेषित केले. तसेच कार चालक अंकुश उद्धव अवचार व इतर जखमींवर प्रथमाेपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले. या अपघातात प्रवाशी वाहनातील सुयाेग परसराम भुके व अक्षय रंगारी हे सुद्धा जखमी झाले आहेत़ या प्रकरणी श्रीहरी निखाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पाेलिसांनी स्काॅर्पिओ चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय वसंत पवार करीत आहेत.