कृषी विधेयकाला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:57+5:302020-12-26T04:27:57+5:30
चिखली : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सुरू केलेला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध असल्याचे प्रतिपादन ...

कृषी विधेयकाला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध
चिखली : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सुरू केलेला विरोध म्हणजे शेतकरी हिताला विरोध असल्याचे प्रतिपादन आ.श्वेता महाले यांनी केले. भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त उंद्री येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बाेलत हाेत्या.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देशभरातील जवळपास १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकाचवेळी जवळपास १८ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली. यानुषंगाने पंतप्रधान मोदींचे संबोधन ऐकविण्याचा उंद्री येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, चिखली विधानसभा मतदार संघातसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी टीव्ही संच लावून पंतप्रधान मोदी यांचे संबोधन हजारो लोकांपर्यंत पोहोचविले. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उंद्री येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात आ.महाले यांनी कृषी विधेयकाबाबत मार्गदर्शन केले. किमान आधारभूत किंमत व्यवस्था बंद होणार नाही, बाजार समित्या सुरू राहतील, कंत्राटी शेतीमध्ये फक्त पिकांचा करार होणार असल्याने जमिनीबाबत विक्री, भाडेतत्व अथवा तारण अशा कुठल्याही प्रकारे जमिनीचे हस्तांतरण होणार नाही, शेती करारात पिकाचा खरेदी भाव अगोदरच नमूद केल्या जाईल, करारात निर्धारित केलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्यास सरकारी कारवाई होऊन दंड आकारला जाईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही कंपनीशी केलेला व्यवहार शेतकरी कुठलाही दंड न भरता कोणत्याही क्षणी करार रद्द करू शकतो, असे असतानाही शेतकऱ्यांची दिशाभूल करीत विरोधकांना थेट शेतकऱ्यांच्या हितालाच विरोध करणे चालविले असल्याचा घणाघात या मेळाव्यात आ.महालेंनी केला आहे. यावेळी काका कलंत्री, रमेश बाहेती, दयासागर महाले, पं.स.सदस्य जितेंद्र कलंत्री, गजानन इंगळे, संजय महाले, बळीराम काळे, राधा कापसे, राजू राठी, भीमराव अंभोरे, गणेश यंगड आदींची प्रमुख उपस्थिती होती. संचालन अमोल साठे तर आभार सुनील पोफळे यांनी मानले.