समृद्धी महामार्गावरून लग्नासाठी निघालेले; कार अपघातामध्ये एक ठार, एक जखमी
By निलेश जोशी | Updated: April 29, 2023 20:53 IST2023-04-29T20:50:32+5:302023-04-29T20:53:49+5:30
सिंदखेड राजा नजीक झाला अपघात: मृतक व जखमी सिल्वासा, दादरा नगर हवेलीचे रहिवाशी

समृद्धी महामार्गावरून लग्नासाठी निघालेले; कार अपघातामध्ये एक ठार, एक जखमी
सिंदखेड राजा: समृद्धी महामार्गावर कारचा अपघात होऊन एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सिंदखेड राजा नजीक टोल नाक्याजवळ २९ एप्रिल रोजी सायंकाळदरम्यान झाला.
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. सिल्वासा, दादरा नगर हवेली येथून जिवन महाडीग व त्यांचे कुटुंबिय हे नागपूर येथे जात होते. दरम्यान सिंदखेड राजा शहरानजीकच्या टोलनाक्यावजवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. यामध्ये निलम महाडिक यांचा सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला तर जीवन महाडिक हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या समवेत असलेले यश महाडिक, सोहम महाडिक, सौम्या महाडीक हे तिघे सुखरूप असून यातील दोन छोटी मुले आहेत.
नागपूर येथे एका लग्नासाठी ते जात होते. दरम्यान सायंकाळी हा अपघात झाला. मृत महिलेचे पार्थिव सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या सोबतच जवळपास ७ लाख रुपये रोख व काही दागिनेही होते, अशी माहिती असून ते पोलिस ठाण्यात सुरक्षीत ठेवण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.