दुचाकी-बस अपघातात एक ठार

By Admin | Updated: June 7, 2014 00:24 IST2014-06-06T23:36:37+5:302014-06-07T00:24:24+5:30

चिखली -बुलडाणा मार्गावरील पळसखेड जयंती फाट्याजवळ अपघातात एक ठार;तिघे गंभीर जखमी

One killed in a bike-bus crash | दुचाकी-बस अपघातात एक ठार

दुचाकी-बस अपघातात एक ठार

चिखली : शिरपूर येथील व्यसनमुक्ती केंद्राला भेट देऊन परत जात असताना दुचाकीची व राज्य परिवहन मंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना ६ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास चिखली -बुलडाणा मार्गावरील पळसखेड जयंती फाट्याजवळ घडली. या अपघातातील गंभीर जखमींपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, जखमी व मृतक तिघेही बीड जिल्हय़ातील माजलगाव तालुक्यातील डुंबेझरी येथील आहेत.
याबाबत असे की, बीड जिल्हय़ातील माजलगाव तालुक्यातील डुंबेझरी येथील बंडू हरिभाऊ गायकवाड (वय ४५), पोपट बंडू गायकवाड (वय १८) व कचरू गणपत निकम (वय ४0) हे तिघे जण दुचाकी क्रमांक एम.एच.२२ ए.सी.४१५७ ने शिरपूरहून चिखलीकडे येत होते, तर हिंगोली आगाराची हिंगोली-बुलडाणा क्र.एम.एच.0६ एफ.८७७४ ही बस चिखलीवरून बुलडाणाकडे जात असताना येथून जवळच असलेल्या पळसखेड जयंती फाट्याजवळ दुचाकी व बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पीएसआय भोई व वाहतूक शाखेचे पोहेकाँ गोविंद नेमणार व सहकार्‍यांनी तातडीने जखमींना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलडाणा व तेथून औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान, औरंगाबादकडे नेत असताना गंभीर जखमींपैकी पोपट बंडू गायकवाड (वय १८) याचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्हय़ातील हे तिघे जण शिरपूर येथे दारू सोडण्यासाठी आले होते. गुरुवारी मुक्काम करून आज सकाळी परत आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला.

Web Title: One killed in a bike-bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.