दोन अपघातात एक ठार, दोन जण जखमी
By Admin | Updated: October 25, 2015 01:10 IST2015-10-25T01:10:28+5:302015-10-25T01:10:28+5:30
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दसरा सणानिमित्ताचे खासगी काम आटोपून दुचाकीने गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५)...

दोन अपघातात एक ठार, दोन जण जखमी
अहेरी, इंदाराम येथील घटना : नागपूरला नेताना एकाचा मृत्यू
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास दसरा सणानिमित्ताचे खासगी काम आटोपून दुचाकीने गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५) दोघेही रा. नागपूर हे अहेरीकडून नागपूरकडे जात होते. दरम्यान अहेरी-चंद्रपूर मार्गावर मुतापूर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जण जखमी झाले. या दोन्ही जखमींना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे.
दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अहेरी-इंदाराम मार्गावर घडला. राकेश आत्राम (२९) रा. इंदाराम हा युवक आपल्या दुचाकीने अहेरीकडे जात होता. दरम्यान व्यंकटरावपेठा गावाजवळ ट्रॅक्टरने त्याला धडक दिली. यात राकेश गंभीर जखमी झाला. गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूर येथे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. राकेशच्या पार्थीवावर शनिवारी इंदाराम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या तीन-चार महिन्यांत अहेरी तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक मार्गाची दुरवस्था झाल्याने रात्रीच्या सुमारास अहेरी-आलापल्ली मार्गावर अपघात घडत आहेत. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी केली जखमींची विचारपूस
दसरा सणानिमित्त नागपूरवरून आलेल्या गोपाल चिंतामन उमरेडकर (५५) व गणेश लहानूजी बारापात्रे (४५) रा. नागपूर हे मुतापूर फाट्याजवळ घडलेल्या अपघातात जखमी झाले. या दोन्ही जखमींना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यासाठी पालकमंत्र्यांनी वाहनाची व्यवस्था केली. यावेळी त्यांच्यासोबत कुमार अवधेशरावबाबा व प्रविणरावबाबा व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.