लाच मागणार्या ठाणेदारावर गुन्हा
By Admin | Updated: August 13, 2014 23:38 IST2014-08-13T23:26:23+5:302014-08-13T23:38:19+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिस स्टेशन येथील ठाणेदाराविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.

लाच मागणार्या ठाणेदारावर गुन्हा
बुलडाणा : रेतीचे ट्रक न अडविण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच मागणार्या अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश डांबरे यांच्यावर बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ ऑगस्ट रोजी कारवाई करून गुन्हा दाखल केला.
रेतीचे ट्रक न अडवता वाहतूक सुरु ठेवण्यासाठी अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश चंद्रभान डांबरे यांनी सहा हजार रुपयांची मागणी केली, अशी तक्रार डिग्रस येथील ज्ञानेश्वर वाघ यांनी बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ ऑगस्ट रोजी केली होती. त्या तक्रारीनुसार पडताळणीत लाच मागीतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचार्यांनी सापळा रचला; मात्र यादरम्यान ठाणेदार डाबरे यांनी ज्ञानेश्वर वाघ यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही. त्यामुळे कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार ठाणेदार डांबरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक एस.एल.मुंढे, पोलिस निरीक्षक भाईक, एएसआय भांगे, शेकोकार, नेवरे, ढोमणे, गडाख, ठाकरे, शेळके आदी सहभागी झाले होते.