आता शालेय शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर!
By Admin | Updated: June 5, 2014 22:50 IST2014-06-05T22:43:33+5:302014-06-05T22:50:24+5:30
विभागात ९ जूनपासून सुरुवात: शिक्षक व गटशिक्षणाधिकारी यांना प्रशिक्षण

आता शालेय शिक्षणात प्रात्यक्षिकावर भर!
अमोल जायभाये / खामगाव
शांतिनिकेतनची आठवण यावी, अशा पध्दतीने प्राथमिक शाळांचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे. नव्या रचनेनुसार शिक्षण रंजक, नाट्यमय आणि जिवंत होणार असून, त्यादृष्टीने शिक्षण विभाग कामालाही लागला आहे. नव्या पद्धतीचे हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
२0१४-१५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि चवथीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना ते जास्तीत जास्त सोप्या पध्दतीने समजावे, यासाठी सर्वप्रथम ते शिक्षकांना समजणे आवश्यक आहे. पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २0१२ नुसार इयत्ता तिसरी आणि चवथीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २0१४-१५ या शैक्षणिक वर्षात होणार आहे. हा अभ्यासक्रम ह्यदृष्टिक्षेपात प्रशिक्षणह्ण यावर आधारित आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचना वादावर भर देण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रम आधी शिक्षकांना समजणे आवश्यक आहे; तरच ते विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे शिक्षकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कला आणि कार्यानुभवाचे शिक्षण घेताना, विद्यार्थ्यांना नाट्यमय स्वरुपात माहिती देण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नवीन अभ्यासक्रम नीट समजावा, यासाठी प्रात्यक्षिक स्वरुपाच्या शिक्षणावर भर राहणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग जास्तीत जास्त राहणार आहे. यातून मुलांना आनंदायी शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.
नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देताना अभ्यासक्रम- पाठय़पुस्तक समन्वय, माहिती- तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, गटकार्याला भरपूर संधी, अभ्यासक्रम कसा संक्रमित करावयाचा यावर भर, उत्कृष्ट व तज्ज्ञ व्यक्तींची निवड, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये प्रात्यक्षिक व कृतींवर भर, राज्यस्तरीय तज्ज्ञांमार्फत जिल्हास्तरीय साधन व्यक्तींना प्रशिक्षण, वर्ग अध्ययन आणि अध्यापनाचे दिग्दर्शन, स्वाध्याय व स्वअध्ययनावर भर दिला जाणार आहे.