नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित!

By Admin | Updated: June 8, 2017 02:29 IST2017-06-08T02:29:13+5:302017-06-08T02:29:13+5:30

पावसाळा आला तरी कृषी पंपांची वीज जोडणी नाही

Nine thousand connections pending! | नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित!

नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित!

संदीप गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : विदर्भ व मराठवाड्यातील कृषी पंपांचा वीज कनेक्शनचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील नऊ हजारांवर जोडण्या प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांना कितीही पोल लागले तरी पैसे भरण्याचे काम नाही. फक्त प्रती एचपी प्रमाणे डिमांड नोट भरावयाची आहे, असे असले तरी बऱ्याच शेतकऱ्यांना एक वर्षापेक्षाही जास्त काळ उलटूनही अद्यापपर्यंत वीज कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी असून, आता पावसाळा आला तरी कनेक्शन न मिळाल्याने या वर्षात तरी कनेक्शन मिळेल की नाही, शंकाच आहे.
बुलडाणा जिल्ह्यात वीज वितरणचे तीन उपविभाग असून, मलकापूर उपविभागातील प्रलंबित कृषीपंपाच्या जोडण्यांची संख्या पुढीलप्रमाणे मलकापूर ४९०, नांदुरा ८१०, मोताळा ८७०, जळगाव जामोद ६२०., खामगाव उपविभाग - खामगाव ग्रामीण ७६१, शहर ८०, लोणार ७५२, मेहकर १२७०, संग्रामपूर ४७१, शेगाव २६५, बुलडाणा उपविभाग - बुलडाणा ४१२, चिखली १०३०, देऊळगाव राजा ५३०, सिंदखेडराजा ७८५, धाड २६० असे जिल्हाभरात जवळपास नऊ हजारापेक्षा जास्त कृषी पंपांचे वीज जोडण्या प्रलंबित असून, आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जोडण्या प्रलंबित कशाप्रकारे करण्यात येणार आहेत, हे अनाकलनीय आहे.
विदर्भातील शेती बहुतांशी कोरडवाहू आहे. असे असले तरी बरेच शेतकरी शासकीय योजनांमधून किंवा स्वखर्चाने विहिरी व कूपनलिका करून आपली शेती बागायती करण्याचा प्रयत्न करतात; परंतु मोठ्या आशेने विहिरी खोदल्यावर किंवा कूपनलिका केल्यावर त्यावर कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी शेतकरी वर्गाला तब्बल वर्ष-वर्ष वाट पहावी लागत असल्याने त्याच्या आशेवर पाणी फिरते व विहीर खोदूनही बागायत होत नसल्याने आपण गुन्हा केला की काय, अशी भावना तयार होते.
विहीर किंवा कूपनलिकेकरिता कृषी पंपासाठी आवश्यक वीज पुरवठ्यासाठी वीज वितरण कार्यालयाकडे अर्ज करून डिमांड नोट भरल्यावर शेतकऱ्यास एक महिन्याच्या कालावधीत वीज कनेक्शन देणे आवश्यक आहे. असे असतानाही बऱ्याच शेतकऱ्यांना डिमांड नोट भरून वर्ष उलटले असले, तरी अद्यापही वीज पुरवठा मिळाला नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. कार्यालयात विचारणा केली असता, तुमचे काम ठेकेदाराला दिले आहे, तेच करतील; अशी उत्तरे मिळतात. त्यामुळे नाइलाजास्तव शेतकरी वीज कनेक्शनची वाट पाहण्यापलीकडे काही करू शकत नाही.
वीज वितरण कार्यालय काही मोजक्याच मर्जीच्या ठेकेदारांना काम देत असल्याने या ठेकेदारांकडे कामाचा लोड जास्त होतो. त्या प्रमाणात मनुष्यबळ किंवा साधन सामग्री त्यांचेजवळ नसते त्यामुळे कनेक्शन मिळण्यास उशीर होतो.

शेतकऱ्यांनी ग्राहक मंचात दाद मागावी
डिमांड नोट भरल्यानंतर एक महिन्यात वीज कनेक्शन देणे अनिवार्य असूनही वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. याविरूध्द शेतकऱ्यास ग्राहक मंचात दाद मागता येते. परंतु अज्ञानामुळे शेतकरी काहीच न करता वीज कनेक्शनची केवळ वाट पाहत बसतो.

विद्युत पोलकरिता पैशांची गरज नाही
कृषीपंपासाठी प्रती एच.पी. ५०० रूपये डिमांड नोट भरावी लागते. म्हणजेच तीन एचपी मोटारसाठी १५०० रूपये तर पाच एचपी मोटारसाठी २५०० रूपये. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शनसाठी विशेष पॅकेज जाहीर झाले असल्याने कितीही पोल विहिरीपर्यंत लागत असले तरी शेतकऱ्यास पैसे देण्याची गरज नाही. असे असले तरी ठेकेदार प्रती पोल पैशाची मागणी करतात.

Web Title: Nine thousand connections pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.