प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा खून
By Admin | Updated: April 6, 2017 00:58 IST2017-04-06T00:58:54+5:302017-04-06T00:58:54+5:30
मलकापूर : ११ दिवसांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील निमखेड येथे बुधवारी घडली.

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा खून
जन्मदात्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल: ११ दिवसांपूर्वी झाला होता आंतरजातीय विवाह
मलकापूर : ११ दिवसांपूर्वी मनाविरुद्ध प्रेमविवाह केलेल्या मुलीचा जन्मदात्या पित्यानेच निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील निमखेड येथे बुधवारी घडली. दरम्यान, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मुलीच्या पित्याविरुद्ध रात्री उशिरा भादंवि ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
निमखेड येथील गणेश गजानन हिंगणे (२७) व मनीषा बाळू हिवरे (२१) यांनी २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता. विवाह केल्यानंतर गणेश व मनीषा जवळपास एक आठवडा मलकापूर येथे राहिले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच निमखेड येथे गणेशच्या घरी राहायला आले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी गणेश कामानिमित्त बुलडाणा येथे गेला होता.
त्याचे वडील गजानन हिंगणे हेसुद्धा दाताळा येथे बँकेत कामानिमित्त गेले होते, तर गणेशची आई कापूस वेचण्यासाठी शेतात गेली असल्याने मनीषा घरी एकटीच होती. नेमक्या याचवेळी तिचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला.
हातावरील मेंदी सुकली नाही!
गणेश व मनीषा हे दोघेही निमखेड येथे एकमेकांच्या घराजवळच राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम जुळले आणि त्यांनी शेवटपर्यंत सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. २६ मार्चला मंदिरात विवाहही केला; परंतु अवघ्या ११ दिवसांतच मनीषाची हत्या झाल्याने त्यांच्या सुखी संसाराचे स्वप्न अर्धवट राहिले. हातावरील मेंदी सुकण्याच्या आतच मनीषाची झालेली हत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली आहे.
हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सदर विवाहितेवर हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिला तिच्यावर हल्ला कुणी केला, असा प्रश्न विचारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सदर विवाहितेला तुझ्यावर हल्ला कुणी केला, तुझ्या वडिलाने केला काय? असे प्रश्न विचारण्यात येत आहेत. या व्हिडिओची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे.
हत्या करणाऱ्या बापाला अटक
मनीषाची हत्या केल्यानंतर बाळू हिवरे याने जावई गणेशला भ्रमणध्वनीद्वारे या कृत्याची माहिती दिली. लगेचच गणेशने बुलडाणा येथून निमखेड येथील परमेश्वर क्षीरसागर यांना कळवून घरी पाठवले व स्वत: निमखेडकडे धाव घेतली. गणेशने मित्रासोबत घर गाठले त्यावेळी मनीषा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. मनीषाने स्वत:च्या वडिलांनीच हे क्रूर कृत्य केल्याचे सांगितले. यावेळी पोलीस पाटील, दिनकर दोडे व गणेशचा मित्र गवळी हजर होते. जखमी मनीषाला तत्काळ मलकापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले; परंतु घाव वर्मी लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, बाळू हिवरेला बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रात्री उशिरा भादंवि ३0२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.