नेताजींनी देशभक्तीची चेतना विदेशातही जागवली - विश्वास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 11:38 IST2021-01-24T11:38:46+5:302021-01-24T11:38:58+5:30

Buldhana News राष्ट्रभक्ती कशी असावी, याचा आदर्श सुभाषबाबूंनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी येथे केले.

Netaji awakened patriotism abroad too - Vishwas Patil | नेताजींनी देशभक्तीची चेतना विदेशातही जागवली - विश्वास पाटील

नेताजींनी देशभक्तीची चेतना विदेशातही जागवली - विश्वास पाटील

बुलडाणा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जिकरीचा लढा दिला. आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर प्रत्येकाला असावा, याविषयी युवकांमध्ये प्रेरणा जागवली. भारताच्या देशभक्तीची चेतना विदेशातही जागविण्याचे काम केले. राष्ट्रभक्ती कशी असावी, याचा आदर्श सुभाषबाबूंनी घालून दिला आहे, असे प्रतिपादन कादंबरीकार विश्वास पाटील यांनी शनिवारी येथे केले.

कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी, बुलडाणा (गर्दे वाचनालय सभागृह) येथे देशातील पहिले नेताजी जागर साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बाेलत हाेते. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, बारोमासकार प्रा. सदानंद देशमुख, जयश्री शेळके, विजय अंभोरे, जयसिंगराजे देशमुख, सुरेश साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

विश्वास पाटील पुढे म्हणाले, नेताजींच्या कार्यावर अभ्यास करताना अनेक देशात फिरलाे असता अवाक् झालो. जपानमध्ये महिलांना प्रोत्साहित करून त्यांनी एवढे परिवर्तन घडवून आणले की आज महिलाच कारभारी आहेत. सिंगापूरमध्येही त्यांनी क्रांती घडविली. झाशी राणी ब्रिगेड त्यांनी स्थापन केले. महिलांच्या हाती बंदूक देणारे नेताजी पहिले क्रांतिकारी आहेत असल्याचे ते म्हणाले. महात्मा गांधी आणि नेताजी यांच्यात बेबनाव झाला होता. त्रिपुरा काँग्रेसमध्ये नेताजी भरघोस मतांनी निवडून आले. पण गांधींनीच सुभाषचंद्र बोस यांना पदावरून हटविण्याचा ठराव घेतला होता, असे पाटील यांनी बाेलताना सांगितले. नेताजींना नवी क्रांती करायची होती. मात्र, त्यांच्या सेनेतील सैनिकांना त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जाही मिळाला नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सैनिकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिली, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.

संमेलनाच्या प्रारंभी सकाळी ८ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

Web Title: Netaji awakened patriotism abroad too - Vishwas Patil