क्षयरोगावर उपचार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:46+5:302021-08-28T04:38:46+5:30
जिल्ह्यात क्षयरोग निवारण विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या मासिक मानधनावर गुजराण करावी लागते. त्यातही हे मानधन वेळेवर मिळत ...

क्षयरोगावर उपचार करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपेक्षा
जिल्ह्यात क्षयरोग निवारण विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंज्या मासिक मानधनावर गुजराण करावी लागते. त्यातही हे मानधन वेळेवर मिळत नाही. मानधनासाठी दरवेळी दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. त्यात संबंधित कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील संस्थांना भेटी देण्यासाठी देय असलेला प्रवास व इंधन भत्ता गत वर्षभरापासून प्रलंबित आहे. अशा स्थितीत विलंबाने मिळणाऱ्या अत्यल्प मानधनातूनच कर्मचाऱ्यांना आपल्या वाहनांचा इंधन, प्रवास व इतर खर्च करावा लागत आहे. वाढती महागाई व इंधनदरवाढ पाहता मानधनातून घर चालविणे जिकिरीचे झाले असताना प्रवास व इंधनावर खर्च करायचा कोठून? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत. नियमित मासिक मानधन मिळत नसल्यानेही कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याबाबत बुलडाणा जिल्हा क्षयरोग कंत्राटी कर्मचारी संघटनेद्वारे ४ ऑगस्ट रोजी जिल्हा क्षयरोग अधिकारी, जि. प. मुकाअ यांना निवेदन देऊन मासिक मानधन नियमितपणे देण्यात यावे, वर्षभरापासून प्रलंबित प्रवास व इंधन भत्ता देण्यात यावा, अन्यथा अहवाल सादरीकरण व दूरचित्रवाणी सभेवर बहिष्काराचा इशारासुद्धा देण्यात आला होता. मात्र, निवेदन देऊन १० दिवस उलटूनही या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती ओढावली आहे.
नियमित मानधन देण्याची मागणी
कोरोनाइतकाच धोकादायक असणाऱ्या क्षयरोगाच्या उपचारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या क्षयरोग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत नियमित मासिक मानधन व प्रवास आणि इंधन भत्ता मिळावा, अशी मागणी बुलडाणा जिल्हा क्षयरोग कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नितीन इंगळे, मंगेश गावंडे, अमोल देशमुख, रविकांत पेहकर, आशिष धरतरकर, मुकेश होंगे, नितीन कुळकर्णी, अनिल पन्हाड, राजू गवई, चंद्रशेखर पाटील, सुभाष खोंडे, प्रशांत भडंग, अभिजित सरदार, झिशान खान, आशिष कापसे, राजू मोरे, धनश्याम देशमुख, नितीन व्यवहारे, विजय काकडे, उर्मिला जाधव, दीपक बाभूळकर, सुरडकर, सिद्धेश्वर सोळंकी, आर. पी. शेगोकार यांनी केली आहे.