बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गैरव्यवहार
By Admin | Updated: May 30, 2014 23:44 IST2014-05-30T23:41:40+5:302014-05-30T23:44:22+5:30
मोताळा तालुक्यातील खरबडी येथील बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हजारो रूपयांची अफरातफर!

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गैरव्यवहार
मोताळा: तालुक्यातील खरबडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हजारो रूपयांची अफरातफर करून गैरव्यवहार केल्याची गंभीर बाब समोर आली असून, या बाबत खरबडी ग्रामपंचायतसह खातेदारांनी बुलडाणा येथील रिजनल व मोताळा येथील शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. खरबडी येथे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असून प्रशांत सोळंकी या केंद्र चालकाने खरबडी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये काही महिन्यांपूर्वी हे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले होते. सुरूवातीला या केंद्रामध्ये सर्व व्यवहार हे सुरळीत सुरू होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रशांत सोळंकी यांनी खरबडी येथे येणेच बंद केल्यामुळे येथील खातेदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सद्या हे केंद्र बंद असल्यामुळे ग्राहकांनी स्टेट बँकेच्या मोताळा शाखेशी सपंर्क साधून या बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून हे ग्राहक सेवा केंद्राचा पदभार काढून घेण्यात आल्याचे सांगितल्या गेले. या केंद्रामार्फत जी खाती काढलेली आहेत, त्याच खाते क्रमांकावर मोताळा शाखेमधून व्यवहार सुरू केला. मात्र खातेदारांना खरबडी येथील केंद्रात जेवढी रक्कम त्यावेळी खात्यात जमा केलेली होती, त्या रकमेत व मोताळा शाखेत व्यवहार करतेवेळीच्या रकमेत तफावत दिसून आली. पासबुकमध्येसुद्धा प्रत्यक्ष भरलेली रक्कम व मोताळा शाखेत व्यवहार करतांनाची रक्कम जुळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गैरप्रकाराबाबत बर्याच खातेदारांनी भारतीय स्टेट बँकेच्या मोताळा शाखेशी सपंर्क साधून लेखी तक्रारीसुद्धा केल्या आहेत, मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसल्याचे खातेदारांचे म्हणने आहे. त्यामुळे स्टेट बँकेचे अधिकारी हे ग्राहक सेवा केंद्रचालकाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार खरबडी ग्रा.पं.च्या सरपंच पुष्पा गजानन सोळंके यांनी केली आहे.