हातगाड्या झाल्या ‘मिनी वाईनबार’!
By Admin | Updated: July 26, 2014 22:51 IST2014-07-26T22:51:04+5:302014-07-26T22:51:04+5:30
पोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्यावर दारुची खुलेआम विक्री

हातगाड्या झाल्या ‘मिनी वाईनबार’!
खामगाव: शहरातील आमलेट पावच्या गाड्यावर काही मद्यप्रेमी सर्रास दारू पित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या गाड्यांवर केवळ दारू पिल्या जात नाही तर या गाड्यांवरून दारूची मोठय़ाप्रमाणात विक्री होत असल्याचे लोकमतने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आले आहे.
ह्यसंडे हो या मंडे, रोज खाओ अंडेह्णया प्रचलित म्हणीनुसार अंड्यापासून निर्मित विविध पदार्थांवर ताव मारणार्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंड्यापासून निर्मित पदार्थांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे गेल्या काही वर्षात शहर आणि परिसरात या पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक वाढले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आमलेट पावच्या शंभराच्यावर गाड्या आहेत. या गाड्यावर आमलेट, अंडा बॉईल, बॉईल फ्राय, बॉईल भूर्जी, अंडाकरी आदी पदार्थ विकल्या जातात. अंड्याकडे स्नॅक्स म्हणूनही पाहल्या जाते. दारूडे दारू पिण्यापूर्वी ह्यस्टार्टरह्णम्हणून अंड्यापासून निर्मित मेनूलाच पसंती देतात. त्यामुळे दारू दुकानाच्या आसपास हमखास आमलेट पावच्या गाड्या दिसून येतात. या शिवाय गर्दीच्या ठिकाणीही मोठय़ाप्रमाणात आमलेट पावची विक्री होते. दरम्यान, आमलेट व्यावसायिकांवर कुणाचाही वचक नसल्यामुळे काही आमलेट विक्रेते चक्क आता या गाड्यांवरून दारूची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे काही गाड्यावर मनसोक्त दारू पिण्यास मुभा दिली जात असल्याचे चित्र आहे.
बाजाराच्या दिवशी या गाड्यांवर दारू पिणार्यांची मोठी संख्या असते. लोकमतने केलेल्या पाहणीत दारू दुकानांच्या नजीक असलेल्या गाड्यांवर काही लोक या गाड्यावर केवळ दारू पिण्यासाठीच येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील काही आमलेट पावच्या गाड्या मिनीवाईनबार बनल्याचे चित्र आहे.