सूक्ष्म सिंचनाचे १३ कोटींचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 16:48 IST2020-12-04T16:48:12+5:302020-12-04T16:48:34+5:30
Buldhana News जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १२ कोटी ८४ लाख रुपयांचे हे अनुदान थकीत आहे.

सूक्ष्म सिंचनाचे १३ कोटींचे अनुदान रखडले
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एकीकडे जिल्ह्याचे अर्थकारण हे अनलॉकच्या प्रक्रियेमुळे पूर्वपदावर येत असले तरी जिल्ह्यातील ४ हजार ४७५ शेतकऱ्यांचे सूक्षम सिंचनाचे अर्थात ठिबक व तुषार संचाचे अनुदान रखडलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १२ कोटी ८४ लाख रुपयांचे हे अनुदान थकीत आहे. कोरोना संसर्गामुळे मधल्या काळात प्रशासकीय पातळीवर अडचणी होत्या. कृषी विभागाकडे निधी उपलब्धतेची अडचण होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात हे अनुदान मिळू शकले नाही. या व्यतिरिक्त बुलडाणा जिल्ह्यातील सामूहिक शेततळ्यांचे, शेडनेट आणि कांदा चाळीचे अनुदानही शासनस्तरावर रखडलेले आहे. त्यामुळे आता अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांच्या रखडलेल्या या अनुदानाचाही विचार होऊन त्यांना हे अनुदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मुळातच सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्यातच पाण्याच्या बचतीसोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहे. त्या माध्यमातूनच सुरू असलेल्या कृषी विभागांतर्गतच्या या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहे; मात्र चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे प्रशासकीय पातळी निधीच्या उपलब्धतेची समस्या निर्माण झाली होती. आता बऱ्यापैकी या समस्या सुटत असल्या शेतकरी शेतकऱ्याला प्राधान्याने त्याचे थकीत अनुदान मिळण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाईही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. त्यातच आता छोट्या व मोठ्या शेतकऱ्यांचे हे रखडलेले अनुदान त्यांना उपलब्ध होण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग व तत्सम कारणामुळे हे अनुदान शासनस्तरावर रखडलेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.