खामगाव एमआयडीसीतील अथर्व इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग
By अनिल गवई | Updated: April 6, 2024 14:07 IST2024-04-06T14:07:04+5:302024-04-06T14:07:40+5:30
लक्षावधी रुपयांची हानी, पहाटेची घटना

खामगाव एमआयडीसीतील अथर्व इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: स्थानिक एमआयडीसीतील एका ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये पहाटे पाच वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. धुराच्या लाटांसह क्षणार्धात आगीच्या ज्वाळांनी उग्र स्वरूप धारण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक एमआयडीसीमध्ये गोयनका उद्योग समुहाच्या मालकीची अथर्व इंडस्ट्रीज नामक कृषी उद्योग आहे. या उद्योगाला पहाटे अचानक आग लागली. या आगीत इंडस्ट्रीजमधील लक्षावधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियत्रंण मिळण्यासाठी खामगाव, शेगाव, मलकापूर, नांदुरा आणि चिखली येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अनेक बंबाचा मारा केल्यानंतर सकाळी ८ : ४० वाजता दरम्यान ही आग आटोक्यात आली. ही आग नेमकी कशामुळे लागली. याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.