रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजार फुलला
By Admin | Updated: July 28, 2014 00:13 IST2014-07-28T00:11:30+5:302014-07-28T00:13:11+5:30
पवित्र रमजानच्या ३0 रोजांपैकी २३ रोजे पूर्ण; शेगाव नगरीत ईदचा उत्साह.

रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजार फुलला
फहीम देशमुख / शेगाव
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे पर्व सुरू झाले असून, आगामी ईदूल फित्र अर्थात रमजान ईदसाठी खरेदीची धूमधाम सुरू आहे. या खरेदीमुळे येथील बाजार फुलला आहे.
सध्या पवित्र रमजानच्या ३0 रोजांपैकी २३ रोजे पूर्ण झाले आहेत. आता वेध लागले आहेत ते ईदचे. ईदचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. विशेषत: महिला, युवती व लहान मुलांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ फुलून दिसत आहे. येथील बांगड्यांच्या बाजारामध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. या बाजारात जोधपूर, कोलकाता, हैदराबाद येथील बांगड्यांची आवक अधिक असून त्यांना तुलनेने अधिक पसंती दिसते. महागाई वाढली असली तरी ईदसाठी बाजारात विक्री समाधानकारक आहे, असे व्यापार्यांनी सांगितले.
हैदराबादच्या गोठला महिला जास्त पसंती देत आहेत. यामध्ये काचेचे सुंदर खडे सजवले असतात. ब्रासच्या बांगड्यांमध्ये फॅमिली सेट, जंबो सेटची जास्त मागणी आहे. हैदराबादी गोट २00 ते ५00 रुपयांपयर्ंत उपलब्ध आहेत. तयार कपड्यांच्या दुकानातही अशीच गर्दी असल्याचे दिसून येत आहे. युवतींमध्ये अनारकली व अंब्रेला अशा कमीजना पसंती मिळत आहे. त्याचबरोबर जयपूर, हैदराबाद व कलकत्ता येथील एंब्रॉयडरी केलेल्या सलवारची मागणी वाढली आहे.
युवक-युवती महिला व थोरांच्या बरोबरच बालगोपालांसाठी विविध आकर्षक चष्मे, बेल्ट, कॅप्स, लाईट व म्युजीकचे बुट आदी मुंबई, कलकत्ता व दिल्ली येथील वस्तू व खेळण्यांमुळे बालगोपालांचाही उत्साह ईदच्या खरेदीमध्ये द्विगुणीत झाल्याचे दिसून येत आहे.