बाजार समिती सचिव, निरीक्षक निलंबित
By Admin | Updated: June 11, 2016 02:44 IST2016-06-11T02:44:16+5:302016-06-11T02:44:16+5:30
किरकोळ कापूस खरेदीत अनियमितता भोवली!

बाजार समिती सचिव, निरीक्षक निलंबित
देऊळगावराजा (जि. बुलडाणा): प्रशासकीय मंडळाची मान्यता नसताना किरकोळ कापूस खरेदी मार्केट फी कमी करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे ५ लाख १९ हजार ७५५ रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी समितीचे सचिव मधुकर शिंगणे व कापूस निरीक्षक गणेश पाटील यांना अखेर एका आदेशाने निलंबित करण्यात आले. सन २0१४-१५ ह्या कापूस हंगामात किरकोळ कापूस खरेदीत मार्केट फी कमी करून प्रशासक मंडळाला अंधारात ठेवले व यामधून स्वहित साधून बाजार समितीचे ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार जवळखेड येथील शेतकरी भीमराव आबाराव जाधव यांनी जिल्हा उपनिबंधक व पणन महासंघाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालक यांच्या आदेशानंतर बाजार समिती संचालक यांच्या आदेशानंतर बाजार समिती संचालक मंडळाने उपसभापती निर्मला संजय मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्य समिती नेमली. ह्या समितीने भुसार बाजारच्या बांधकामात तांत्रिक व आर्थिक अनियमितता, बांधकाम बाबतचे मोजमाप पुस्तक न करता पगार करणे, भुईकाटा सर्व्हिसिंग व रिपेअरिंगच्या देयकसंदर्भात वार्षिक अंकेक्षणमध्ये सचिव शिंगणे यांना दोषी ठरवून त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. ह्या सर्व प्रकरणाबद्दल शिंगणे यांनी समितीसमोर समाधानकारक स्पष्टीकरण सादर न केल्याने चौकशी समितीने बाजार समितीचे सचिव म.तु. शिंगणे, कापूस निरीक्षक गणेश पाटील यांना दोषी ठरविले होते व दोघांकडून ५ लाख १९ हजारांची वसुलीची शिफारस केली होती. याप्रकरणी बाजार समिती सभापती रंगनाथ कोल्हे यांनी ९ जून २0१६ रोजी एका आदेशाने १0 जूनपासून एक महिन्यासाठी निलंबित केले.