स्वातंत्र्य प्राप्तीपासून मढी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित!
By Admin | Updated: May 7, 2017 02:17 IST2017-05-07T02:17:50+5:302017-05-07T02:17:50+5:30
आमदारांसह सर्व अधिकार्यांनी केली पाहणी

स्वातंत्र्य प्राप्तीपासून मढी गाव मूलभूत सुविधांपासून वंचित!
किशोर मापारी
लोणार : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वैज्ञानिक प्रगती करत देश जागतिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना गेल्या ७0 वर्षांंपासून तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गाव विकासापासून वंचित आहे.
मढी गावात रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थांना जिवंतपणीच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. चारही बाजूनी जंगल असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी दीड वर्षापूर्वी मढी गावाला भेट देऊन संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना विकासकामे त्वरित सुरू करण्यासाठी सांगितले होते. परंतु, अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या दीड वर्षात रस्ते व पाणी प्रश्न कायम असल्यामुळे मढी ग्रामस्थ किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत, याचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यालयप्रमुखांना घेऊन आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी ५ मे रोजी मढी गावाला अधिकार्यांची वारी करून आणली.
तालुक्यातील मराठवाड्याच्या टोकावर असलेले मढी घनदाट जंगलाच्या आणि डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव आहे. जेमतेम ३00 लोकसंख्या असल्यामुळे मढी आणि सावरगाव मुंढे ही दोन गावे मिळून एक गटग्रामपंचायत आहे. गेल्या ७0 वषार्ंपासून आदिवासीबहुल मढी गावाला कोणताही पक्का किंवा कच्चा रस्ता नसल्यामुळे गावाचा विकास होऊ शकला नाही. रस्त्याअभावी वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी पोहचू न शकल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गावात पाणी आणि वीज नसल्यामुळे ग्रामस्थ नरकयातना भोगत जीवन जगत आहेत. याची जाणीव झाल्याने आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी दीड वर्षांंपूर्वी मढी गावाला भेट देऊन पाहणी करत समस्या जाणून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा प्रथम पूर्ण करण्यात याव्यात, याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांना सूचनादेखील केल्या होत्या. परंतु वर्षभराचे बिल एकदमच आल्याने ग्रामस्थ वीज बिल भरू शकले नाहीत. यामुळे पुन्हा त्यांना उन्हाळ्यात दिवसा उकाड्यात आणि रात्री अंधारात राहावे लागत आहे. अधिकार्यांच्या काम न करण्याच्या वृत्तीमुळे ग्रामस्थ अजूनही नरकयातना भोगत जीवन जगत असल्याची माहिती मिळताच आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी तालुक्यातील सर्वच प्रशासकीय कार्यालयप्रमुखांना सोबत घेऊन गावाची वारी घडवून आणली. गावात फिरून तेथील हलाखीची परिस्थिती दाखवून दिली. त्यामुळे आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी निर्णय घेत १३ मे रोजी रस्ता आणि विहिरीचे भूमिपूजन करण्यात येईल, तसेच आमदार निधीतून सभामंडप करण्यात येईल, असे आश्वासन दिले.