भररस्त्यावर कापूस व्यापार्याला लुटले
By Admin | Updated: July 1, 2014 02:22 IST2014-07-01T02:11:26+5:302014-07-01T02:22:37+5:30
मलकापूर येथे कापूस विक्री करुन दुचाकीने गावाकडे परत जाणार्या कापूस व्यापार्याला अज्ञात चोरट्यांनी लुटले.

भररस्त्यावर कापूस व्यापार्याला लुटले
पिंप्रीगवळी : मलकापूर येथे कापूस विक्री करुन दुचाकीने गावाकडे परत जाणार्या कापूस व्यापार्यावर अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यावर हल्ला केला. यानंतर चोरट्यांनी व्यापार्याकडील ४ लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मोताळा तालुक्यातील पिंप्रीगवळी ते माकोडी फाटा दरम्यान घडली.
मोताळा तालुक्यातील काबरखेड येथील शांताराम श्रीराम मुके हे कापूस विक्रीच्या व्यवहारासाठी सकाळी मलकापूरला गेले होते. विक्रीतून मिळालेली ४ लाख २५ हजार रुपयाची रक्कम घेवून ते सायंकाळी दुचाकीने काबरखेडकडे जात होते. या दरम्यान माकोडी फाट्यापासून काही अंतरावर मागुन आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्यांना श्री स्वामी सर्मथ मंदिराचा पत्ता विचारला. शांताराम मुके यांनी दुचाकी थांबवून माहिती देत असतांना एका युवकाने मुके यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकली तर दुसर्या युवकाने पोटावर चाकूने वार केला. या हल्ल्यात खाली कोसळलेल्या मुके यांच्या हातातून पैशाची बॅग घेवून तिनही अज्ञात युवक फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच धामणगावबढे पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे, बोराखेडीचे पोलिस निरिक्षक शेवाळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हल्ल्यात जखमी शांताराम मुके यांच्यावर पिंप्रीगवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. वृत्त लिहेपर्यत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.