नैसर्गिक आपत्तीतून ग्रामस्थांनी घेतला धडा!
By Admin | Updated: August 4, 2014 23:22 IST2014-08-04T23:22:43+5:302014-08-04T23:22:43+5:30
हिवरखेड : गावात चारा डेपो सुरू करण्याचा निर्धार

नैसर्गिक आपत्तीतून ग्रामस्थांनी घेतला धडा!
खामगाव: तालुक्यातील हिवरखेड येथे चारा टंचाई आणि वातावरणातील बदलामुळे शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यामुळे गावातील पशुपालक आणि शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या कटू घटनेतून बोध घेत हिवरखेड ग्रामपंचायतीने पशुपालक आणि शेतकर्यांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गत आठवड्यात या एकाच गावातील शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली. यानंतर गावातील पशुपालक आणि शेतकर्यांना विविध योजनेतून मदत मिळवून देण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. यासंदर्भात विविध ठराव ग्रामपंचायतीने नुकत्याच पार पडलेल्या सभेत पारीत केले आहेत. आपल्या विविध मागण्यांचा प्रस्तावही ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांत महसूल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे २५ जुलै रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे दीडशेच्यावर जनावरे मृत्यूमुखी पडली होती. यासाठी गावातील चारा टंचाई कारणीभूत असल्याने पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे हिवरखेड परिसरात चारा डेपो सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतीत पारीत करण्यात आला. या शिवाय अत्यल्प पावसामुळे दुबार पेरणीचे संकट कोसळलेल्या शेतकर्यांना मदत देण्यासाठी कर्जबाजारी शेतकर्यांना दिलासा म्हणून शासकीय योजनेतून शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. याशिवाय मोठय़ा प्रमाणात जनावरे मृत्यूमुखी पडलेल्या पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावरून आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा ठरावही यावेळी घेण्यात आला. सरपंच मनोहर पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जुलै रोजी पार पडलेल्या या सभेला सचिव ए.के. अंभोरे, उपसरपंच श्रीराम धंदरे, सदस्य कलाबाई कडाळे, तुकाराम गवई, गजानन वानखडे आदी सदस्य उपस्थित होते.
** शेतकरी जगविण्यासाठीच धडपड!
पावसाच्या लहरीपणामुळे हिवरखेड परिसरातील अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले असतानाच पशुपालक शेतकर्यांची शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडली. नैसर्गिक आपत्तीमुळे हिवरखेड येथील शेतकरी आणि पशुपालकांवर दुहेरी संकट कोसळले आहे. तालुक्यात सर्वाधिक हानी हिवरखेडमध्ये झाली आहे. शासनाने गावातील शेतकरी, पशुपालक जगविण्यासाठी मदत द्यावी, अशी ग्रामपंचायतीची भूमिका असून त्यादिशेने चारा डेपो सुरू करण्यासोबतच शेतकर्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी रेटा दिल्या जाणार असल्याचे ग्रामपंचायतीचे प्रयत्न असल्याचे चित्र आहे.