राजेश शेगोकार /बुलडाणाविधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. बुलडाणा जिल्ह्यातून तीन आमदार नव्यानेच विधानसभेत दाखल होत असून, या प्रत्येकाने इतिहास घडविला आहे. चार आमदार पुन्हा सभागृहाची पायरी चढणार असले तरी ही पायरी चढण्यासाठी त्यांची झालेली ओढाताण ही भविष्यात गेल्या टमपेक्षाही जास्त काम करावे लागणार असल्याचे संकेत देणारी आहे. त्यामुळे बुलडाण्यातील सातही मतदारसंघांमध्ये हाती आलेले निकाल हे नव्या पर्वाचा आरंभ करणारे जसे आहेत तसेच त्यांच्यावर नव्या अपेक्षांचे ओझे ठेवणारेही आहेत.बुलडाणा मतदारसंघात सर्वार्थाने नव्या पर्वाचा प्रारंभ आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सपकाळांनी नेत्यांच्या नव्हे, तर लोकांच्या भरवशावर निवडणूक लढली व लोकांनीच त्यांना विजयी केले. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर लोकांच्या अपेक्षांचे ओझे हे सर्वाधिक राहणार आहे. बुलडाण्याच्या खालोखाल किंबहुना सत्तापक्षाचे असल्यामुळे त्याहीपेक्षा जास्त अ पेक्षांचे ओझे हे खामगावचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्यावर आले आहे. जातीच्या नव्हे, तर विकासकामांच्या भरवशावर दिलीपकुमार सानंदा यांनी निर्माण केलेल्या साम्राज्या पेक्षा एक पाऊल पुढे जाऊन त्यांना काम करावे लागेल.सिंदखेडराजा मतदारसंघात सतत दहा वर्षांपासून लोकांच्या सुखदु:खात धावून जाणारा कार्यकर्ता आता आमदार झाला आहे. डॉ. शशिकांत खेडेकर व उषा खेडेकर हे दाम्पत्य या मतदारसंघात सर्वांना परिचित आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रभावात असलेला हा मतदारसंघ भगव्या झंझावातात नेताना त्यांचाही कस लागणार आहे. सतत दोन दशके सत्तेत राहूनही या मतदारसंघाची दशा अन् दिशा हा चिंतेचा अन् चिंतनाचा विषय आहे त्यामुळे डॉ. खेडेकरांसमोरचे आव्हान मोठे आहे. जातीपातीच्या राजकारणात अडकलेला हा मतदारसंघ यापुढे विकासाच्या मुद्यावर मतदान करेल, हे सिद्ध करण्याची मोठी संधी डॉ.खेडेकर यांच्या पुढे आहे. या तीन आमदारांव्यतिरिक्त उरलेले चार आमदार हे सभागृहात अनुभवी आहे. चैनसुख संचेती यांना मंत्रिपदाची मोठी संधी आहे. सतत पाचव्यांदा निवडून येताना त्यांची मोठी दमछाक झाली. जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांची मेहनत सफल झाली. पक्ष व म तदारसंघ सांभाळताना त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान ठेवत युवा नेत्यांनाही संधी दिली. त्यामुळे आता येणार्या काळात खारपाणपट्टामुक्त जळगाव जामोद हा त्यांचा अजेंडा असला पाहिजे. चिखलीचे आमदार राहुल बोेंद्रे यावेळी प्रचंड जातीय समीकरणात अडकले होते. कधी गटांमुळे, तर कधी जातींमुळे नेत्यांचा बळी घेणारा हा मतदारसंघ यावेळी मात्र विकासाच्या सोबतीला राहिला. बोंद्रे यांच्याविषयी उभी करण्यात आलेली नाराजी ही त्यांच्या वागण्या- बोलण्यात किंबुहना देहबोलीमुळे सर्वाधिक होती. मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर हे सर्वार्थाने भाग्यवान आहेत. मात्र, केवळ नशिबावर नव्हे, तर नशिबाला परिङ्म्रमाचीही जोड देण्याचे त्यांचे कौशल्य असल्याने ते पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी झालेत. यदाकदाचित शिवसेना मंत्रिमंडळात सहभागी झालीच, तर मंत्री म्हणूनदेखील त्यांची वर्णी लागू शकते.
आरंभ नव्या पर्वाचा..नव्या अपेक्षांचा !
By admin | Updated: October 26, 2014 23:37 IST