काय सांगता... लोणार सरोवरात चक्क मासे ! प्रशासनाला झटका, जैवविविधतेची ऐशीतैशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 12:46 IST2025-11-02T12:45:31+5:302025-11-02T12:46:35+5:30
सरोवर परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे

काय सांगता... लोणार सरोवरात चक्क मासे ! प्रशासनाला झटका, जैवविविधतेची ऐशीतैशी
मयूर गोलेच्छा, लोकमत न्यूज नेटवर्क, लोणार (जि. बुलढाणा) : दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जगविख्यात लोणार सरोवरातील खाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासे दिसू लागले आहेत. सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी महिनाभरापूर्वी ‘सरोवरात मासे असूच शकत नाहीत’ असे ठाम विधान केले होते. मात्र, आता पारदर्शक झालेल्या पाण्यात माशांचे प्रत्यक्ष अस्तित्व स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे सरोवर परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांचा दावा
दर मंगळवारी कमळजा मातेच्या दर्शनासाठी सरोवरात येणाऱ्या स्थानिक नागरिकांनी पाण्यात विविध आकाराचे मासे पाहिल्याचा दावा केला. काहींनी व्हिडिओ व छायाचित्रे टिपली आहेत. ‘आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाण्यात मासे पाहिले,’ असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिणामी प्रशासनाचे ‘सरोवर मासेविरहित आहे’ हे विधान आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
अतिवृष्टीचे गोडे पाणी, सांडपाणीही मिसळते
सरोवराच्या क्षारतेमुळे येथे पूर्वी कोणत्याही प्रकारचे मासे टिकू शकत नव्हते. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्यांद्वारे गोडे पाणी आणि सांडपाणी सरोवरात मिसळल्याने वातावरणात बदल झाला. ‘लोकमत’ने २२ सप्टेंबर रोजीच ‘सरोवरात तिलापिया माशांचा प्रवेश’ झाल्याचे वृत्त दिले होते. तज्ज्ञांच्या मते, पाण्याचा खारटपणा कमी झाल्याने माशांच्या काही प्रजातींसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरोवराच्या आत, कमळजा मातेच्या मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात मासे दिसून आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी अमरावती येथे पाठविले आहेत. सोबतच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत.
-चेतन राठोड, सज्यय्यक वनसंरक्षक, वन्यजीव अकोला