खामगाव : बंदमुळे एसटीचे लक्षावधीचे उत्पन्न बुडाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:30 IST2018-01-05T01:28:15+5:302018-01-05T01:30:00+5:30
खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. एसटीच्या खामगाव आगारातील ४६६ फेर्या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्यात ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे.

खामगाव : बंदमुळे एसटीचे लक्षावधीचे उत्पन्न बुडाले!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले. एसटीच्या खामगाव आगारातील ४६६ फेर्या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्यात ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे.
१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बंद होती. यामध्ये खासगी वाहतुकीसोबतच एसटी महामंडळाचाही समावेश होता. बुलडाणा विभागात बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद आणि शेगाव आगाराचा समावेश असून, बुधवारी जिल्ह्यातील सर्वच आगारामध्ये एसटी बस उभ्या होत्या. परिणामी, सर्वच सातही आगारांतील एसटीचे शेड्युल्ड रद्द झाल्याने हजारो फेर्या प्रभावित झाल्या होत्या. यामध्ये खामगाव आगारातील ६३ शेड्युल्ड म्हणजेच ४६६ फेर्या तर मलकापूर आगारातील ६४ शेड्युल्ड तर शेगाव आगारातील १६७ बसफेर्या रद्द झाल्या. हीच स्थिती जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, जळगाव जामोद येथेही दिसून आली. त्यामुळे खामगाव आगाराचे सहा लाख रुपयांचे, मलकापूर आगाराचे सात लाख रुपयांचे तर शेगाव आगाराचे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. बुलडाणा, मेहकर, चिखली, जळगाव जामोद आगारालाही मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याने, बुलडाणा जिल्ह्यात एसटीला सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्रवासी उत्पन्नात घट!
एसटी कर्मचारी संप, अवैध प्रवासी वाहतूक, डीझल दरवाढ, प्रवासी कर यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नात घट होत आहे. त्यातच भरीस भर म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि आकस्मिक संकटाचाही सामना एसटी महामंडळाला करावा लागत आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी उत्पनाला फटका बसत आहे.
बंदमुळे खामगाव आगारातील ६३ शेड्युल्ड रद्द झाल्याने, ४६६ फेर्या प्रभावित झाल्या. त्यामुळे खामगाव आगाराचे सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.
- आर. आर. फुलपगारे,
आगार व्यवस्थापक, खामगाव.