- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा येथील एका महिलेने खामगाव येथील उपजिल्हा रूग्णालयात मुलीस जन्म दिला. मात्र, सामान्य रूग्णालयाने जन्माची नोंद करताना मुलगा म्हणून बाळाच्या जन्माचा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे नगर पालिका प्रशासनाने मुलाचे जन्म प्रमाणपत्र तयार केले. हे जन्मप्रमाणपत्र हाती पडल्यानंतर संबंंधित मुलीच्या वडीलांना चांगलाच धक्का बसला असून, आता त्यांना मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चांगलेच हेलपाटे घ्यावे लागताहेत.उप जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र, आता उपचारानंतर देखील रूग्णांच्या नातेवाईकांचा सामान्य रूग्णालय व्यवस्थापन ‘पिच्छा’ सोडत नसल्याची धक्कादायब बाब उघडकीस आली आहे. नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा येथील अंबादास कडू खवले (३१) यांच्या पत्नी सौ. विद्या अंबादास खवले यांनी ०८ नोव्हेंबर २०१८ रोजी मुलीस जन्म दिला. त्यानंतर त्यांना ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सुटी देण्यात आली. सुटीच्या दाखल्यावर मुलीच्या जन्माची नोंद करण्यात आली. मात्र, या मुलीचा जन्म अहवाल खामगाव पालिकेत पाठवितांना चक्क मुलगा जन्माला नोंद करण्यात आली. त्यामुळे खामगाव पालिकेने मुलाच्या जन्माची नोंद करून प्रमाणपत्र तयार केले. दरम्यान, आजारपण आणि इतर उपयोगासाठी या मुलीचे जन्मप्रमाणपत्र तयार करताना पालिका प्रशासन आणि तिच्या वडीलांच्या निदर्शनास सामान्य रुग्णालय प्रशासनाची ही चूक आली. सुटीच्या दाखल्यावर चुकीची नोंद करण्यात आली असून, या दाखल्यावर वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रूग्णालय खामगाव यांची स्वाक्षरी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामान्य रूग्णालय प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून, यासंदर्भात काहीही बोलण्यास रूग्णालय प्रशासन तयार नाही, हे येथे उल्लेखनिय!
मुलगी जन्माला आल्यानंतरही सामान्य रूग्णालयाने मुलगा जन्मल्याचा अहवाल तयार केला. याप्रकारामुळे आपणास प्रचंड मनस्ताप होत आहे. दरम्यान, मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र मिळविण्यातही अडसर निर्माण झाला आहे. चूक दुरूस्त करून आपणांस जन्म प्रमाणपत्र मिळावे.- अंबादास खवलेमुलीचे वडील, रा. हिंगणा भोटा ता. नांदुरा.
सामान्य रूग्णालयातून आलेल्या जन्म अहवालावरून खामगाव पालिकेत प्रमाणपत्र तयार करण्यात येते. संबंधीत प्रकरणामध्ये देखील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाने सादर केलेल्या अहवालावरून प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रकरणाशी पालिका प्रशासनाचा कोणताही संबंध नाही.- राजू मुळीकजन्म मृत्यू लिपिक, नगर परिषद, खामगाव.