खामगाव शहरात धावताहेत खटारा ऑटो!
By Admin | Updated: July 29, 2014 23:40 IST2014-07-29T23:40:39+5:302014-07-29T23:40:39+5:30
हेडलाईट, नंबर प्लेट, इंडिकेटर आणि साईड मिररकडेही दुर्लक्ष

खामगाव शहरात धावताहेत खटारा ऑटो!
खामगाव : मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाला हेडलाईट, नंबरप्लेट, साईड इंडिकेटर या सोबतच साईड मिरर असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात मोटार वाहन कायद्याची ऐशीतेशी करीत शेकडो 'खटारा' ऑटो रस्त्यावर धावत असल्याची बाब ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनावर धावणार्या दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहनांना हेडलाईट, नंबरप्लेट, साईड इंडिकेटर यासोबतच साईड मिरर असणे बंधणकारक आहे. मात्र, कायद्याचे भय नसल्यामुळे ऑटो चालकांचा बेशिस्तपणा वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिस, वाहतूक पोलिस वाहन पकडल्यानंतर 'सेटींग' करून सोडतात. त्यामुळे अनेकजण खटारा वाहनही रस्त्यावर चालविण्याचे धाडस करीत असल्याचेही लोकमतच्या पाहणीत दिसून आले. हेडलाईट, साईड मिरर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास त्यांचे गंभीर परिणाम रस्त्याने जाणार्या इतर नागरिकांनादेखील भोगावे लागू शकतात. त्यामुळे वैयक्तिक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर ठरणार नाहीत ना, याची प्रत्येकाला जाणीव असणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात शहरातील रस्त्यांवर दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेवून 'लोकमत'ने शहरातील ऑटो चालकांना याबाबत काही प्रश्न विचारलेत. नागरिकांच्या आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेतून अंत्यत क्षुल्लक असलेल्या या बाबींचा ऊहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आलेत. काहींनी आपण दिवसा ऑटो चालवितो. रात्री चालवित नाही. त्यामुळे हेड लाईटची आवश्यकताच काय?, असा प्रतिप्रश्न केला. नंबर प्लेट बाबत अनेकांनी आपली चूक असल्याची कबुली दिली. मात्र, काही ऑटोचालकांनी पोलिसांच्या खाबुगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल्प रक्कमेत वाहतूक पोलिस वाहन सोडत असल्यामुळे आपण नंबर प्लेट लावली नसल्याचेही एका ऑटो चालकाने सांगितले. साईड मिरर लावणे आवश्यक आहे. मात्र, या मिररची चोरी होत असल्यामुळे आपण लावले नसल्याचेही एका ऑटो चालकाने सांगितले. इंडिकेटर तुटल्यानंतर पुन्हा बसविणे परवडण्यासारखे नसतात. तुटलेल्या इंडिकेटरकडे जाणून-बूजून दुर्लक्ष करणार्यांचेही प्रमाण जास्त आहे. नियमांच्या विरोधात जाणार्या या सर्व बाबींकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केल्या जाते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येत नाही, हे येथे उल्लेखनिय!
** असे केले सर्वेक्षण
शहरातील मुख्य रस्त्यावर धावणार्या ऑटोची गर्दीच्यावेळी आणि कमी गर्दीच्यावेळी पाहणी करण्यात आली. तीन टप्यात हे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ६८८ ऑटोची पाहणी करण्यात आली. हेड लाईड नसलेले ऑटो- ४४, उजवे साईड इंडिकेटर नाही- २७, डावे साईड इंडिकेटर नाही-३४, दोन्ही साईड इंडिेकेटर नाही- ४६, समोर नंबर प्लेट नसलेले ऑटो- ६९, मागे नंबर प्लेट नसलेले ऑटो- २३. दोन्ही नंबर प्लेट नसलेले ऑटो- ३२, साईड मिरर नसलेले ऑटो- ७४, काच तुटलेले ऑटो- १४.