कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद; बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:35 IST2018-01-02T12:58:28+5:302018-01-03T01:35:45+5:30
बुलडाणा: नगर-पुणे महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या वादाचे पडसाद बुलडाणा शहरामध्येही मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पडले.

कोरेगाव भीमा घटनेचे बुलडाण्यातही पडसाद; बाजारपेठ बंद
बुलडाणा: नगर-पुणे महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे सोमवारी झालेल्या वादाचे पडसाद बुलडाणा शहरामध्येही मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पडले. शहरातील जनता चौक भागात दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, एका बसवरही दगडफेक झाली आहे. दुसरीकडे तरुणांचा जमाव शहरातील मुख्य मार्गावरून व्यापारी प्रतिष्ठाणे बंद करण्याचे आवाहन करीत फिरत असून बुलडाणा बसस्थानकामध्येही या जमावाने काही काळ ठिय्या दिला. बुलडाणा शहरातील मुख्य मार्गावरून युवकांचा हा जमाव सध्या फिरत आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून दंगाकाबू पथकही पाचारण केले असून उपविभाीय पोलिस अधिकारी बी. बी.महामुनी व बुलडाणा पोलिस कर्मचारीही बसस्थानकात दाखल झाले होते. बसस्थानकातून हा जमाव पुन्हा चिंचोले हॉस्पीटलच्या रोडने गेला. शहरातील संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठाणे बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बसस्थानकातील बसेस थेट डेपोमध्ये लावण्यात आल्या होत्या. बाहेर गावाहून येणारी बसही थेट डेपोमध्ये पाठविण्यात येत होती.