मुकाअच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: July 29, 2014 23:44 IST2014-07-29T23:44:08+5:302014-07-29T23:44:08+5:30
समायोजन झालेले मुख्याध्यापक रूजू नाही

मुकाअच्या आदेशाला केराची टोपली
सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन १५ जुलै रोजी करण्यात आले होते. परंतू, मोहाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवर वरोडी येथील मुख्याध्यापकाचे समायोजन होवूनही ते २८ जुलै पर्यंत रुजू झाले नसल्याने मुकाअच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
सप्टेंबर २0१३ च्या पटसंख्येनुसार ज्या उच्च प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांची विद्यार्थी पटसंख्या २00९ च्या नियमानुसार १५१ असणे गरजेचे आहे. वरोडी सह अनेक उच्च प्राथमिक शाळेतील पटसंख्या १५१ पेक्षा कमी झाल्याने सिंदखेडराजा पंचायत समिती मधील १६ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन जिल्हा परिषदेने १५ जुलै रोजी केले. वरोडी येथील मुख्याध्यापक संतोष नामदेव सरकटे यांचेही समायोजन मोहाडी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेवर करण्यात आले. विशेष वरोडी येथील जि.प.शाळेत १४२ विद्यार्थी संख्या असल्याने सरकटे यांची बदली मोहाडी येथे झाली. १५ जुलैलाच उपरोक्त बदलीच्या ठिकाणी जावून आठ दिवसात अहवाल पंचायत समितीला सादर करावा, असा आदेश मुकाअ यांचा असतांना २८ जुलै पर्यंत सरकटे रुजू झाले नाही. अगोदरच मोहाडी येथील मुख्याध्यापकाचे पद दिड वर्षापासून रिक्त आहे. त्याचा कारभार सहाय्यक शिक्षक शे.याकूब शे.गुलाब यांचेकडे अतिरिक्त कारभार आहे. एक पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे असते. परंतु शिक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पालकवर्गातही संताप व्यक्त होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संतोष सरकटे यांनी शाळेवर तात्काळ रुजू व्हावे, अशी मागणी पालकवर्गांंमधुन होत आहे.