बुलडाणा जिल्ह्यातील सहा गावांच्या टप्प्याने जिगावचे पुनर्वसन
By Admin | Updated: March 3, 2015 01:33 IST2015-03-03T01:33:35+5:302015-03-03T01:33:35+5:30
महसूलमंत्री खडसे यांची घोषणा; खडकपूर्णासह इतर प्रकल्पांचाही घेतला आढावा.

बुलडाणा जिल्ह्यातील सहा गावांच्या टप्प्याने जिगावचे पुनर्वसन
बुलडाणा : जिल्ह्यातील खडकपूर्णा व जिगाव प्रकल्पांमुळे बाधित गावांचे पुनर्वसन हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामधील जिगाव प्रकल्पाचे पुनर्वसन करताना सहा गावांचे एक याप्रमाणे पाच टप्प्याटप्प्यात पुनर्वसन करावे व तेथे सर्व मूलभूत नागरी सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश कृषी, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.
जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी व लघू प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार पांडुरंग फुंडकर, संजय रायमूलकर, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते.
जिगाव प्रकल्पामध्ये पूर्णत: ३२, अंशत: १५ अशा एकूण ४७ गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यापैकी पूर्णत: बाधित ३२ गावांमध्ये पुनर्वसनासाठी नवीन गावठाण निश्चित करण्यात आले आहे.
या गावांच्या पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात यावे व पहिल्या टप्प्यात सहा गावे घेऊन त्याचे आदर्श पुनर्वसन व्हावे, अशी अपेक्षा महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली. जिगाव प्रकल्पात ७ हजार ९८0 कुटुंबे बाधित झाली आहेत.
कायद्याप्रमाणे पुनर्वसित गावांमध्ये किमान १८ नागरी सुविधा देण्याचे निर्देशित करीत पुनर्वसनाच्या कामामध्ये बेजबाबदारी बाळगणार्या अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचेही खडसे म्हणाले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशंपाडे, उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुळकर्णी, पवार, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनावणे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग, मिथिलेश चव्हाण आदी उपस्थित होते.