सिंदखेडराजा तालुक्यातील माल जालना जिल्ह्यात
By Admin | Updated: March 24, 2017 01:30 IST2017-03-24T01:30:05+5:302017-03-24T01:30:05+5:30
शेतक-यांची घालमेल; नाफेड केंद्रावर लागतात तुरीच्या वाहनांच्या रांगा सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार.

सिंदखेडराजा तालुक्यातील माल जालना जिल्ह्यात
अशोक इंगळे
सिंदखेडराजा, दि. २३- सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा इतर शहरात मालाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा कल मोठय़ा बाजार समितीत जास्त आहे. केवळ नाफेड केंद्रावरच तुरीच्या वाहनांच्या रांगा लागत असून, इतर शेतमाल जालना जिल्ह्यात जात आहे.
तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत साखरखेर्डा, दुसरबीड आणि सिंदखेडराजा येथे कृषी मालाची खरेदी चालते. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा परिसरातील शेतकरी खामगाव आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल नेवून विकतात. तर दुसरबीड, किनगावराजा, सिंदखेडराजा परिसरातील शेतकरी जालना आणि देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल नेवून विकत आहेत. सोयाबीन हे मुख्य पीक असून, आर्थिक टंचाईमुळे आजही सोयाबीन शेतकर्यांच्या घरातच आहे. बाजार समितीत सोयाबीनला तीन हजार रुपयापेक्षा जास्त भाव नाही. तुरीला बाजार समितीत भाव नसल्याने नाफेड खरेदी केंद्रावर मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आहे. सिंदखेडराजा केंद्रावर आज १00 हून अधिक वाहने उभी आहेत. कोठेच नगदी रक्कम मिळत नसल्याने शेतकर्यांना वाहन खर्च स्वत:च्या खिशातून द्यावा लागतो. सध्या हरभरा, गहू, ज्वारी ही पीकेही शेतकर्यांच्या घरात आली आहेत. हरभरा धान्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २५0 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. गव्हाची आवक कमी असली, तरी भाव मात्र प्रतिक्विंटल १ हजार ८00 रुपयांपर्यंत मिळत आहे; मात्र शेतमाल विक्रीनंतर नगदी पैसे मिळत नाहीत. सर्व रक्कम बँक खात्यात जमा होऊन नंतर शेतकर्यांना ती रक्कम काढता येते; परंतु बँकेत चार ते पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत नाही.
सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सिंदखेडराजा येथे २00 ते २५0 पोत्यांची आवक असून, साखरखेर्डा येथे १५ ते २0, दुसरबीड येथे ५0 ते ७५ पेक्षा जास्त आवक नाही. त्यामुळे येथे व्यापारी थांबायला तयार नाहीत. खामगाव, जालना, देऊळगावराजा, चिखली या शहरात शेतमालाला भाव चांगला मिळतो. ही तफावत मोठय़ा प्रमाणात असल्याने तालुक्यातील सर्वच बाजार समितीचे उपबाजार शेवटची घटका मोजत आहेत.