बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या १३ सप्टेंबरला मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:40 IST2019-09-11T15:40:14+5:302019-09-11T15:40:35+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या १३ सप्टेंबरला मुलाखती
बुलडाणा: १४ व्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल अल्पावधीतच वाजण्याची शक्यात असतानाच राजकीय हालचालांनी वेग घेतला असून बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती १३ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या दादर येथील शिवसेना भवनामध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपनेही गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक असलेल्या ६४ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. दरमयान, या मुलाखतींसाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी प्रामुख्याने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख खा. प्रतापराव जाधव यांनी केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि बुलडाणा या सातही विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या इच्छुकांच्या या मुलाखती होत आहे.
शिवसेनेचीही स्वबळाची तयारी
मध्यंतरी भाजपतर्फे पक्ष निरीक्षक खा. अमर साबळे यांनी बुलडाणा येथे सातही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन भाजप स्वबलाची तयारी करीत असल्याचे संकेत दिले होते. सोबतच युती न झाल्यास स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या भाषणात दिले होते. त्यावेळी सातही विधानसभा मतदार संघातून तब्बल ६४ जण निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्याच धर्तीवर शिवसेनेनेही स्वबळाची चाचपणी सुरू केली असून आचार संहिता लागण्याच्या धामधुमीत थेट मुंबईतच शिवसेना भवनावर मुलाखती घेण्यात येतील.