Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत तीव्र संताप, कुणबी समाज रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 15:09 IST2023-01-31T15:08:52+5:302023-01-31T15:09:37+5:30
संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीला व महामानवांना सार्वजनिक सभा, कथा, राजकीय मेळाव्यांत अवमानजनक विधानांतून बदनाम करण्याची स्पर्धाचं सुरू झाल्याचे दिसत आहे

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या फोटोला जोडे मारत तीव्र संताप, कुणबी समाज रस्त्यावर
मुंबई - बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून संताप व्यक्त केला जात आहे. आता, बागेश्वर बाबाच्या विरोधा कुणबी मराठा समाज रस्त्यावर उतरला असून बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा मंचच्यावतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही बागेश्वर बाबा दिसेल, तिथे ठोकून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
संताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रभूमीला व महामानवांना सार्वजनिक सभा, कथा, राजकीय मेळाव्यांत अवमानजनक विधानांतून बदनाम करण्याची स्पर्धाचं सुरू झाल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीई फुले यांचा अवमान करण्यात आला होता. आता, थेट संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्याबाबत बागेश्वर धीरेंद्र शास्त्री नावाच्या महाराजने टिका केली आहे. त्या निषेधार्थ बुलडाण्यात आज उपविभागीय (महसूल)कार्यालयासमोर धीरेंद्र शास्त्री यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू असताना हा भोंदू जनतेला अंधश्रध्दा व दैविकशक्तीच्या नावाखाली ठगत आहे. या भोंदू धीरेंद्र शास्त्रीवर संत तुकाराम महाराज यांच्याबाबत अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे व अंधश्रद्धा पसरवण्याबाबत लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी कुणबी युवा मंचच्यावतीने कारण्यात आली. अन्यथा संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचच्यावतीने खामगांवसह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व संपूर्ण कुणबी समाज महाराष्ट्रभर आंदोलनचा पवित्रा घेवुन रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बागेश्वर बाबाला ठोकून काढा - मिटकरी
धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते. त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे की, अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचे थोबाड बंद होते. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि अधिष्ठानाला जर असा महाराज काही बोलत असेल, तर मला असे वाटते की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.