खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:53 IST2020-04-03T17:53:08+5:302020-04-03T17:53:18+5:30
शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

खामगाव: धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिसांकडून सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहर आणि तालुक्यातील सर्वधर्मिय धार्मिक स्थळे बंद ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सुचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील संत गजानन महाराज मंदिरानंतर आता सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील तब्बल ५४ धार्मिक स्थळाशी संबंधितांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, जमावबंदीचाही आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वात मोठे देवस्थान असलेल्या संत गजानन महाराज मंदिरातील रामनवमी उत्सव स्थगीत करण्यात आला. त्यानंतर आता जिल्ह्यातील सर्वच लहानसहान तसेच सर्वधर्मिय धार्मिक स्थळ, प्रार्थना मंदिर बंद ठेवण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावल्या. खामगाव शहरातील शहर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशन अंतर्गत ५४ तर ग्रामीण भागातील ४९ धार्मिक स्थळांना सूचना देण्यात आल्या.
पोलिसांकडून विशेष खबरदारी!
मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च आणि बौध्द विहार देखील बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याअनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून संबंधितांना गुरूवारी सायंकाळपासून नोटीस आणि सूचना दिल्या जात आहे.
ग्रामीण भागात सूचना!
ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांना ग्रामीण पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या. शुक्रवारी ग्रामीण भागातील विविध धार्मिक स्थळांची पाहणी ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख यांच्याकडून करण्यात आली.