बैठक व्यवस्थेतील बदलामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 18:11 IST2019-03-31T18:10:40+5:302019-03-31T18:11:07+5:30
बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

बैठक व्यवस्थेतील बदलामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ
बुलडाणा: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्याला लागून असलेली दुकाने हटविल्याने बुलडाण्याच्या कपडा मार्केटमध्ये बैठक व्यवस्थेवरून व्यापाºयांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. कमी जागेत आणखी अस्थायी दुकाने आल्याने आपसी वाद होऊन येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. परिणामस्वरुप पंचक्रोषीत प्रसिद्ध असलेल्या या कपडा मार्केटीची आर्थिक उलाढाल रोडावली आहे.
आठवडी बाजाराच्या दिवशी स्टेट बँक चौक ते न्यायालय इमारतीपर्यंतच्या परिसरात हे कपडे विक्री करणाºयांची अस्थायी दुकाने बसायची. परंतू लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता या परिसरातील ही दुकाने काही कालावधीसाठी अन्यत्र हलविण्याबाबत सुचीत करण्यात आले होते. मात्र त्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे सध्या उपरोक्त गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी बुलडाण्यातील कपडा मार्केटमध्ये दुरवरून नागरिक खरेदीसाठी येतात. घाटावरील मेहकर, लोणार सिंदखेड राजा, चिखली, घाटाखालील मोताळा, मलकापूर, खामगाव त्याचबरोबर मराठवाड्यातील भोकरदन याठिकाणावरूनही काही लोक खरेदी विक्रीसाठी बुलडाणा येथे येतात. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बुलडाण्याच्या रविवारच्या बाजारातून साड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. अनेक लोक तर बुलडण्याच्या बाजारातून खरेदी केलेला कपडा गावोगावी विक्री करतात. त्यामुळे प्रत्येक रविवारला कपडा विक्रीमध्ये लाखोंची उलाढाल याठिकाणी होते. परंतू सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील कपडा मार्केट हटविण्यात आलेले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी असल्याने लोकसभा निवडणुकीच्या कामात कुठलाही व्यत्यय येऊ नये, यासाठी या परिसरातील सर्वच दुकाने हटविण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या न्यायालच ईमारत चौक, कारंजा चौक याठिकाणी कपड्याची दुकाने लावली जातात. परंतू या ठिकाणी दुकाने जास्त व जागा कमी झाल्याने मोठ्या अडचणी वाढल्या आहेत.
बाजारात वाढले वाद
रविवारच्या बाजारामध्ये काही दुकानदारांना जागाच मिळाली नसल्याने रस्त्यावर हातगाड्या उभ्या केल्या जातात. तर काहींनी इतर दुकानाच्या जागेवरच अतिक्रम केलेले आहे. त्यामुळे बाजारामध्ये वादाच्या घटना वाढल्या आहेत. या बाजारात एखादे वाहन आल्यास किरकोळ अपघाताच्या घटनाही घडत असल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी समोर आला.