खामगावात वृद्धांचे पावणेपाच लाख उडविले; दुचाकीस्वारांनी बॅग हिसकावली
By अनिल गवई | Updated: July 24, 2023 14:51 IST2023-07-24T14:51:39+5:302023-07-24T14:51:53+5:30
नांदुरा रोडवरील घटना, दुचाकीवर बसताना दोन चोरट्यांनी हिसकावली बॅग

खामगावात वृद्धांचे पावणेपाच लाख उडविले; दुचाकीस्वारांनी बॅग हिसकावली
खामगाव: शहर आणि परिसरात गत काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत असतानाच, सोमवारी दुपारी एका ५५ वर्षीय इसमाची पावणे पाच लाख रूपये रोकड असलेली बॅग दोन दुचाकीस्वारांनी उडविली. बँकेतून रक्कम काढल्यानंतर दुचाकीवर बसत असतानाच दोन चोरट्यांनी बॅग हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील दिलीप सदाशिव हटकर (५५) सोमवारी दुपारी नांदुरा रोडवरील एका बँकेत मुलासह आले. स्वत: मुलगा आणि आणखी एकाच्या अशा एकूण तिघांच्या खात्यातील ४ लक्ष ७० हजार रुपयांची रोकड बँकेतून काढली. बँकेतून काढलेली रोकड घेऊन ते बाहेर पडले. नांदुरा राेडवरील एका हॉटेल समोर दुचाकीवर बसण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीने पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्याकडील बॅग हिसकवली. काही कळायच्या आतच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी दिलीप हटकर शहर पोलिसांत पोहोचले होते. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने खामगावात होत आहे.