बुलढाणा: अजिंठा मार्गावरील पाडळी व पळसखेड दरम्यान सोमवार ४ ऑगस्टच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास भरधाव दुचाकी थेट कावड यात्रेत घुसल्याने झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेला युवक करवंड (ता. बुलढाणा) येथील मुकेश गजानन राठोड (वय २५) असल्याची माहिती मिळाली आहे.
ही कावड यात्रा गुलभेळी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शिवमंदिरातून रविवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता बुधनेश्वर मंदिरासाठी निघाली होती. यात्रेत ४० हून अधिक युवक सहभागी झाले होते. रात्री १२ वाजता बुधनेश्वर येथे आरती केल्यानंतर श्रावण सोमवारची सुरुवात होत असल्याने ही यात्रा रात्रीच परत निघाली.
यात्रेच्या परतीच्या मार्गावर पाडळी-पळसखेड दरम्यान एमएच २८ बीझेड ५२७४ या क्रमांकाची दुचाकी थेट यात्रेत घुसली. या धडकेत मुकेश राठोड याचा जागीच मृत्यू झाला. तसेच योगेश चव्हाण व आणखी एक कावडधारी युवक जखमी झाले. दुचाकीवरील दोघे – ऋषिकेश काकडे व मनोज मालोदे हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान गंभीर जखमी असलेल्या मुकेश गजानन राठोड याचा उपचार सुरू होण्याआधीच झाला होता. विशेष बाब म्हणजे, ऋषिकेश व मनोज हेही कावड यात्रेत सहभागी झालेले होते. मात्र कावड वाहत असतांना त्यांना थकवा आल्याने त्यांनी परतीसाठी दुचाकीचा मार्ग निवडला होता. ते मुठे लेआऊट, बुलढाणा येथील रहिवासी आहेत.