दुकान जोरात चाललयं तर नवीन ग्राहकांची कमी नाही, नितीन गडकरींचे बुलढाण्यात मार्मिक टोले
By निलेश जोशी | Updated: August 19, 2023 00:12 IST2023-08-19T00:11:48+5:302023-08-19T00:12:27+5:30
Nitin Gadkari: भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे.

दुकान जोरात चाललयं तर नवीन ग्राहकांची कमी नाही, नितीन गडकरींचे बुलढाण्यात मार्मिक टोले
- नीलेश जोशी
बुलढाणा - भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे. नवीन ग्राहकांची कमी नाही. अेारीजनल ग्राहक मात्र दिसत नाही, असा मार्मिक टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी बुलढाणा येथे लगावला.
निमित्त होते भाजपाचे माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे. शुक्रवारी गर्दे वाचणालयात झालेल्या या कार्यक्रमास खा. प्रतापराव जाधव, आ. संजय कुटे, श्वेता महाले, ॲड. आकाश फुंडकर, संजय रायमुलकर, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या २१ मिनीटाच्या भाषणात त्यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करत राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, असे ठणकावून सांगितले. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकास कारण असल्याचे ते म्हणाले. आज राजकारणाचा अर्थच वेगळा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन ग्राहकच अधिक दिसत आहे. जुन्या निष्ठा
यावेळी गडकरींनी आजपर्यंतच्या भाजपाच्या वाटचालीचा धावता आढावा घेत जनसंघाच्या काळात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा नव्हती. परंतू तेव्हा विचार, देश आणि समाजकारणाच्या एका विशिष्ट धेय्यावर प्रतिकुलतेत निवडणुकात हार निश्चीत असतांनाही कार्यकर्ते निष्ठेने कार्यरत रहात होते. जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत केलेल्या कामामुळेच आज भाजप यशाच्या तथा सत्तेच्या शिखराव आहे. परंतू त्यामागे एक विचार होता. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे उत्तरदायित्व देण्याची भूमिका होती. त्यातूनच आपल्याला महामंत्री करण्यात आले होते. आज राजकारणाची व्याख्या बदलली आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण झाल्याचे ते म्हणाले. निस्वार्थ कार्यकर्त्यांनी स्वत:ला पक्षाच्या विचारात वाहून घेतल्यानेच आज पक्ष शिखरावर पोहोचला आहे. आमच दुकान चालायला लागल्यावर नवे कार्यकर्ते जोडल्या गेले. मात्र जुने फारसे दिसत नसल्याचा टोलाही वर्तमान राजकीय परिस्थितीवर त्यांनी लगावला, तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
तरच विश्वगुरू बनू
आज विश्वगुरू बनण्याची आपण कल्पना करत आहोत. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, नव्या तंत्रज्ञानाला आपल्या संस्कार, शैक्षणिक मुल्यांधिष्ठीत संस्कारासोबत इतिहास, संस्कृती व वारश्याची सांगड घालून समाजाची पायाभरणी केल्यास विश्वगुरू बनण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. या माध्यमातून वर्तमानात नॉलेज टान्सफॉर्मेशन करत आपण जागतिक शक्ती केंद्र बनण्याची कुवत ठेवून आहोत, असे गडकरी म्हणाले.