Historic lakes in danger due to water hyacinth! | जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : शहरासह तालुक्याला जलसंकृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ऐतिहासिक वारसा आहेत. मात्र मानवी हस्तक्षेप होत असल्याने ही जलसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे.
अतिक्रमण, प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पाण्यावर जलपर्णी वाढली आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश हे जलपर्णी वाढण्यासाठी मदत करतात. ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जगते. यामुळे डासांचे प्रमाण वाढून आजारांना निमंत्रण मिळत आहे. लेंडी तलावामध्ये जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी सुद्धा हे धोकादायक ठरते. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ.प्रा. सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुराव्यासह स्पष्ट केले आहे. शहराच्या जवळ असलेला लेंडी तलाव नावाने ओळख असलेल्या तलावाला नागार्जुन तलाव, लिंबी तलाव नावानेहही ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या तलावात अनेक वर्षापासून शहराचे घाण सांडपाणी सोडले जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेला लेंडी तलाव संवर्धन करणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)

जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.
- अरुण मापारी, पर्यावरण मित्र, लोणार.

Web Title: Historic lakes in danger due to water hyacinth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.