समाज आणि शासनाकडून ‘हिंदी’ दुर्लक्षित!
By Admin | Updated: September 14, 2014 00:37 IST2014-09-14T00:37:27+5:302014-09-14T00:37:27+5:30
लोकमत परिचर्चा : शहरातील हिंदी शिक्षक, प्राध्यापकांच्या चर्चेतील सुर

समाज आणि शासनाकडून ‘हिंदी’ दुर्लक्षित!
अनिल गवई / खामगाव
खामगाव: समजण्यास सोपी असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हिंदी या भाषेविषयी गोडी आहे. मात्र, पालकांच्या इंग्रजी भाषेच्या अट्टाहासापायी अनेक विद्यार्थी हिंदीसह मातृभाषेपासून दुरावत चालले आहेत. समाज आणि शासनाकडून हिंदीला सापत्न वागणूक मिळत असल्याच्या रोकठोक भावना शहरातील विविध नामांकीत शिक्षण संस्थांमधील शिक्षकवृदांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.
जागतिक हिंदी दिवसांनिमित्त शनिवारी शहरातील विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षकांना बोलते केले असता, त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. इंग्रजी भाषेच्या वाढत्या आकर्षणामुळे मातृभाषा दुर्लक्षित होत आहेत. राज्यातील हिंदी माध्यमांच्या शिक्षण संस्था वगळता अन्य शिक्षण संस्थामध्ये हिंदी भाषेची अतिशय दयनिय अवस्था आहे.
इंग्रजी भाषेसह मराठी शिक्षण संस्थामध्ये हिंदीला अतिशय दुय्यम स्थान दिल्या जात असल्याचेही शिक्षकवृंदांनी स्पष्ट केले. काहींनी हिंदी भाषेचा स्तर उंचावण्यासाठी ही भाषा सक्तीची करण्याचा उपाय सुचविला. एखाद्या भाषेला मोठे करण्यासाठी केवळ तिला कागदोपत्री दर्जा देवून थांबता येणार नाही. हिंदीला राजाश्रय मिळावा. स्वातंत्र्याची चळवळ हिंदीतूनच उभी राहीली. मात्र, नं तर काही स्वार्थी राजकीय पुढार्यांनी या भाषेचा विरोध केला.
तथापि, हिंदी भाषेचे महत्व टिकविण्यासाठी उच्च शिक्षणाचे माध्यम केवळ हिंदी हीच भाषा असावी, असेही मत यावेळी एका शिक्षकाने व्यक्त केले. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे हिंदी भाषेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असल्याची खंत अनेक शिक्षकांनी शेवटी व्यक्त केली.