बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:44 PM2019-11-03T15:44:13+5:302019-11-03T15:44:24+5:30

देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

Heavy Rainfall in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात दाणादाण उडवली असून सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पाडळी शिंदे येथे एकाचा मृत्यू झाला तर बिबी परिसरातील दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या १९ दरवाजातून एक लाख सात हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून देऊळगाव मही नजीकचा पुल पाण्याखाली गेल्याने चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य काही मार्गही बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
देऊळगाव माळी, किनगाव राजा, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, साखरखेर्डा आणि बिबी या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून मलकापूर पांग्रा येथे १४४ मिमी तर बिबी येथे १३५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोणार शहरालगतच्या वझर आघाव, वडगाव तेजन, वडगाव सरद आणि दीपखेड लगतचे नदीवरील पुल वाहून गेल्याने लोणार शहराचा अन्य भागांशी जमिन मार्गे संपर्क तुटला आहे.
खडकपूर्णा प्रकल्पातून २४ आॅक्टोबर नंतर पुन्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून तो ८९ हजार ८२४ क्युसेकवर पोहोचला आहे. त्यामुळे देऊळगाव मही नजीकचा पूल पाण्याखाली गेल्याने चिखली-देऊळगाव राजा वाहतूक ठप्प झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचे १५ गेट एक मिटरने तर चार गेट अर्ध्यामिटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रसंगी येथे आपतकालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता महसूल विभाग सतर्क झाला आहे. पैनगंगा नदीला पुर आल्याने बुलडाणा-चिखली हा मार्ग बंद पडला आहे. सुलतानपूरनजीकही सितान्हाणी येथे पुराच्या पाण्यामुळे महामार्गाचा काही भाग खचून गेल्याने येथे ही वाहतूक ठप्प होती.

दीडशे सुड्या गेल्या वाहून
पैनगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी हे नदी पात्रालगत असलेल्या शेतात घुसल्याने मेहकर तालुक्यातील दादुल गव्हाण, गणपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या तयार शेतमालाच्या १५० सुड्या पैनगंगेत वाहून गेल्या आहेत. दरम्यान, मेहकर बायपासनजीकच्या पैनगंगा नदीच्या पुलावर ३२ मिनीटात ३५ शेतमालाच्या सुड्या वाहून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

Web Title: Heavy Rainfall in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.